belgaum

केंद्राने सोन्यावरील आयात शुल्क वाढ तात्काळ मागे घ्यावी

0
218
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भारत सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात 9 टक्के वाढ करून ते तब्बल 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापी या आयात शुल्क वाढीचा थेट गंभीर फटका देशातील सोने -चांदी व्यवसायातील सुमारे 6 ते 7 कोटी लोकांना, त्याचप्रमाणे सोने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्र सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी ‘पोतदार ज्वेलर्स’ या बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध सोने-चांदी खरेदी विक्री पेढीचे संचालक अनिल पोतदार यांनी केली.

खडेबाजार बेळगाव येथील पोतदार ज्वेलर्स या आपल्या पेढीमध्ये आज गुरुवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. अनिल पोतदार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नागरिकांनी पुढील वर्षभर सोने खरेदी करू नये असे आवाहन केले आहे. तथापि या आवाहनाची अंमलबजावणी देशाच्या अर्थव्यवस्थेला मारक ठरणारी आहे. आज आपला देश सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे सोने परदेशातून आयात करतो. आपल्या देशात किमान 20 टक्के सोने उपलब्ध होत असले तरी उर्वरित 80 टक्के सोन्यासाठी आम्हाला परदेशांवर अवलंबून राहावे लागते. या सोन्याची आयात जर आपल्या देशात झाली नाहीतर आज 1 लाखावर असलेली एक तोळा सोन्याची किंमत अवघ्या कांही तासात 2 लाख रुपयांहून अधिक होऊ शकते. सध्या असलेली सोन्याची किंमतच सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे.

कोरोना, नोटबंदी वगैरे गोष्टींमुळे आपल्या देशात एक सोन्याच्या व्यवसायात 50 टक्के घट झाली आहे. आम्हा सोने-चांदी व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्वीच्या तुलनेत आता निम्मा झाला आहे. या परिस्थितीत आता यापूर्वी केवळ 6 टक्के असलेले आयात शुल्कात सरकारने दुपटीपेक्षा जास्त 15 टक्के वाढ केली आहे. या पद्धतीने शुल्क वाढवण्याचा सरकारचा उद्देश नेमका काय आहे? हेच आम्हाला कळालेले नाही. सध्या सोन्याच्या व्यवसायामध्ये 4 कोटींपेक्षा जास्त लोक काम करत आहेत. तसेच या व्यवसायाशी संबंधित कारागीर, सेटिंग्स करणारे, पॉलिश करणारे असे सुमारे 2.5 कोटी लोक आहेत. अशा या एकूण सुमारे 6 ते 7 कोटी लोकांना, त्याचप्रमाणे सोने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आयात शुल्क वाढीचा थेट फटका बसणार आहे आहे. अशा प्रकारचे प्रतिकूल निर्णय वारंवार घेतले गेल्यास आम्ही आमचा सोन्याचा व्यवसाय चालवायचा कसा? हा मोठा प्रश्न आहे. आम्ही आमचा व्यवसाय चालवायचा आहे की बंद करायचा? आम्ही त्यासाठी देखील तयार आहोत, मात्र तत्पूर्वी सरकारने आमच्या व्यवसायाशी संबंधित 7 कोटी लोकांच्या हितरक्षणाची, त्यांचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी घ्यावी. तथापि त्या अनुषंगाने कोणतीच योजना सरकारकडे नाही. आपण केलेल्या घोषणेमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारकडे पर्याय नसेल तर त्यांनी तशा घोषणा करू नयेत.

 belgaum

वृत्तपत्रांमधून मिळणाऱ्या माहितीनुसार आपल्या देशात अनेक योजना राबविल्या जातात. त्यासाठी आमच्यासारखे व्यापारी आयकरा बरोबरच सुमारे 25 लाख कोटी रुपये जीएसटीच्या स्वरूपात अदा करतात. यामध्ये सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा हिस्सा महत्त्वाचा असतो. अव्वाच्या सव्वा कर अथवा शुल्क वाढ करू नये त्यामुळे सोन्याचा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो, या पद्धतीचे निवेदन यापूर्वी आम्ही बऱ्याचदा सरकारला दिले आहे. आयात शुल्क वाढीमुळे सोन्याचा दर देखील प्रति 10 ग्रॅम 2 लाख रुपयांवर जाणार आहे. परिणामी सोने खरेदीच्या व्यवहारात संपूर्ण घट होणार आहे आणि तसे झाल्यास सोन्याचा व्यवसाय इतिहास जमा होणार आहे.

तसे झाल्यास व्यापारी किंवा मालकांसमोर इतर पर्याय असले तरी आमच्याकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे भवितव्य अंधकारमय होणार आहे आमच्याच सोन्याच्या पेढीमध्ये सेल्समन, कारकून वगैरे काम करणारे शंभरहून अधिक जण आहेत. दुसरी गोष्ट आमचा व्यवसाय बंद झाला तर जीएसटीमध्ये घट होऊन राज्य आणि केंद्र सरकारचे नुकसान होणार आहे. तेव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करून निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र चुकीचा निर्णय घेऊन देशाच्या सरकारने कोट्यावधी लोकांना अपाय करू नये.

आपल्या देशाला सुवर्णभूमी म्हटले जाते. दुसरीकडे केंद्र सरकार देशाला सनातन भूमी, सनातन संस्कार म्हणत असते. मंगळसूत्र हे प्लास्टिकचे चालत नाही ते सोन्याचेच घातले पाहिजे, कारण त्यामध्ये सनातन संस्कार आहेत. देवाच्या मूर्ती किंवा पूजेचे साहित्य हे विशेष करून चांदीचेच असावे लागते. त्यामुळे केंद्र सरकारचा आयात शुल्क वाढीचा हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असून हे दुर्दैवी आहे.

याच्या विरोधात येत्या काळात जिल्हा, राज्य व राष्ट्र पातळीवरील आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही देशव्यापी बेमुदत बंद पुकारण्याचा आमचा विचार आहे. तसे घडल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे असा इशारा देऊन आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी अनिल पोतदार यांनी शेवटी केली. याप्रसंगी पोतदार ज्वेलर्सचे दुसरे संचालक संजय पोतदार हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आयात शुल्क वाढीबद्दल नाराजी व्यक्त करून ही शुल्क वाढ केंद्राने त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.