belgaum

ग्रामीण भागातील शाळा वर्गांच्या गळतीकडे शिक्षण खाते केंव्हा लक्ष देणार?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांच्या छतांना गळती लागली असून वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही शिक्षण खात्यासह संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शाळा सुधारणा समित्या आणि पालक वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांना लागलेली गळती युद्धपातळीवर दुरुस्त करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

सध्याच्या पावसामुळे बेळगाव ग्रामीण भागातील जवळपास सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये छताच्या गळतीची समस्या उद्भवली असून त्यामुळे शाळा सुधारणा समित्या (एसडीएमसी) आणि पालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सांबरा येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेमध्ये तर सर्वच वर्गांना गळतीच्या समस्येने ग्रासले आहे. सध्याच्या पावसामुळे स्लॅबच्या छतातून पाणी टपकण्यासह वर्गात ओलेपणा आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे.

एकंदर परिस्थिती पाहता शाळांमधील छत गळती ताबडतोब रोखण्यात आली नाही तर येत्या पावसाळ्यात वर्गातील साहित्यासह पुस्तके व विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ओलेपणामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. या संदर्भात पालक व एसडीएमसी सदस्यांनी शिक्षण खात्याकडे अनेकदा विनंत्या करून तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. तथापि शिक्षण खात्याने अद्यापपर्यंत शाळांच्या गळती दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

 belgaum

एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान अशा बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) कार्यालयाची इमारत उभारण्यात आली असताना दुसरीकडे सुशिक्षित भावी पिढी घडवणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल शिक्षणप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे शाळांना सध्या सुट्टी असली तरी, त्या येत्या 28 मेपासून पुनश्च सुरू होणार आहेत.

तेंव्हा तत्पूर्वी शाळांच्या वर्ग खोल्यांमधील गळती दुरुस्त करून त्या येत्या पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात सांबरा सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सुधारणा समितीच्या लक्ष्मण जोई, महेश जत्राटी, अशोक लोहार, मोहन हरजी, नागेश धर्मोजी, यल्लाप्पा हरजी, तानाजी कलखांबकर, विकास तुपे, अनिल चौगुले, रूपलक्ष्मी जत्राटी, दिपाली धर्माजी, सविता कोकितकर, अनिता जत्राटी, प्रियांका चौगुले, सुजाता हुची, सौ. कलखांबकर, सौ. पालकर व प्रियांका लोहार यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

तथापि लोकप्रतिनिधी आणि शिक्षण खात्यासह बेळगाव तालुका पंचायत, स्थानिक ग्रामपंचायत वगैरेंकडून गळती दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पावसाळ्यापूर्वी गळती लागलेल्या शाळांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.