belgaum

News impact : हटवली जाणार ‘ती’ धोकादायक टाकी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 या शाळेच्या आवारातील धोकादायक पाण्याच्या टाकी संदर्भातील बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची बेळगाव महापालिकेने दखल घेतली असून सदर नादुरुस्त टाकी महिन्याभरात हटविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची टाकी हटविण्याच्या मागणीसाठी हाती घेतले जाणारे आंदोलन आज मागे घेण्यात आले आहे.

जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 या शाळेच्या आवारात काँक्रीट पिलरवर पाण्याची मोठी टाकी बसवण्यात आली आहे. तथापि गेल्या 2003 पासून नादुरुस्त अवस्थेत धुळखात पडून जीर्ण झालेली ही नादुरुस्त टाकी अलीकडे शाळेतील मुले आणि आसपासच्या रहिवाशांसाठी धोकादायक बनली होती. या प्रचंड मोठ्या पाण्याच्या टाकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे ती ताबडतोब हटवण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

तथापि मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे परवा पुन्हा एकदा महापालिकेला विनंती केल्यानंतर कंटाळलेल्या शाळा परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा अवलंबण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या एक -दोन दिवसात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार होती. दरम्यान सदर धोकादायक पाण्याच्या टाकी संदर्भातील बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत बेळगाव महापालिकेच्या कर्नाटक शहरी विकास पायाभूत सुविधा विभागाचे सहाय्यक अभियंता उमेश निट्टूरकर आज शुक्रवारी सकाळी जुने बेळगावला भेट दिली.

 belgaum

या भेटीप्रसंगी त्यांनी तेथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 च्या आवारातील नादुरुस्त पाण्याच्या टाकीची पाहणी केली. पाहणीअंती त्या जीर्ण टाकीमुळे निर्माण झालेला धोक्याची सत्यता पटताच अभियंता निट्टुरकर यांनी येत्या आठ दिवसात निविदा काढून महिन्याभरात सदर पाण्याची टाकी पाडून हटवण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. याप्रसंगी स्थानिक प्रभाग क्र. 39 चे नगरसेवक उदय उपरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवणगेकर, संदीप पाटील, सोहन खन्नूकर, विनायक पाटील, मोहन बेनके, सचिन पाटील, उमेश गडदे आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना संतोष शिवणगेकर यांनी सांगितले की, येथील शाळा नंबर 33 च्या आवारातील नादुरुस्त अतिशय जिर्ण झालेली पाण्याची टाकी हटवण्यात यावी अशी मागणी आम्ही पुन्हा एकदा परवा दिवशी महापालिका प्रशासनाकडे केली होती. कारण या टाकीमुळे शाळेतील मुले आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.

त्यामुळे येत्या आठ दिवसात जर ही टाकी हटवण्यात आली नाहीतर गावकरी आंदोलन करणार होते. त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार होती. तथापि या भागाचे नगरसेवक उदय उपरी आणि महापालिकेचे कर्नाटक शहरी विकास पायाभूत सुविधा विभागाचे सहाय्यक अभियंता उमेश निट्टूरकर यांनी आज शाळा नंबर 33 च्या ठिकाणी भेट दिली.

तसेच निट्टूरकर यांनी येत्या महिन्याभरात ही टाकी जमीनदोस्त करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात हाती घेतले जाणारे आंदोलन आम्ही आज स्थगित करत आहोत, असे सांगून तथापी येत्या महिन्याभरात आश्वासन दिल्याप्रमाणे जर पाण्याची टाकी हटवण्यात आली नाही तर आम्ही पुन्हा उग्र आंदोलन छेडू, असा इशाराही शिवणगेकर यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.