बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कथित ४,५०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाबाबत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांनी आपल्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक गैरव्यवहार असल्यामुळे ते सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
“या प्रकरणात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार असल्याची शक्यता आहे. सीआयडीमार्फत सखोल चौकशी केली जाईल आणि पुढील कारवाई तपासानंतर निश्चित होईल,” असे त्यांनी म्हटले.
तपासादरम्यान आणखी कोणाची नावे समोर येतात हेही स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असताना त्याला केवळ राजकीय प्रेरित म्हणणे योग्य नाही. काहींच्या भाषणांमुळे परिस्थिती अधिक चिघळली,” असेही ते म्हणाले.
“अतिरिक्त व्याजदर देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात शक्य नसते. मग हे लोक इतका जास्त परतावा कसा देत होते, हा तपासाचा विषय आहे. चौकशीनंतर सर्व सत्य बाहेर येईल,” असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.





