बेळगाव लाईव्ह : बेळगाव-गोकाक महामार्गावरील मुच्चंडी गावाजवळ घडलेल्या हिट-अँड-रन अपघात प्रकरणाचा मारिहाळ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा करत अपघातास कारणीभूत ठरलेल्या टिपर वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ ते ५.३० या वेळेत बेळगावहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एका टिपरने मुच्चंडी गावाजवळील गसारी फळविक्री केंद्रासमोरील बेळगाव-गोकाक रस्त्यावर पायी चालत असलेल्या राजू रामा अष्टेकर (वय ४६, रा. चंदगड) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अष्टेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन न थांबवता घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी मृताच्या नातेवाईक लक्ष्मीबाई गंगप्पा कुकडोळी (रा. लक्ष्मी गल्ली, सुळेबावी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासासाठी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, केए-२२/बी-१६१० क्रमांकाचा, हिरव्या रंगाचे इंजिन आणि लाल रंगाची बॉडी असलेला टिपर संशयाच्या भोवऱ्यात आला.
तपासादरम्यान या टिपरचा चालक अदृश्यप्पा गंगय्या मास्तमरडी (मूळ रा. प्रभूनगर, ता. खानापूर, सध्या रा. कणबर्गी) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने अपघात केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित टिपरचे तांत्रिक व वैज्ञानिक परीक्षण केले असता, याच वाहनामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.
तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केल्याबद्दल मारिहाळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) आणि एसीपी (बेळगाव ग्रामीण) यांनी विशेष कौतुक केले आहे.





