बेळगाव लाईव्ह : राम मंदिर ट्रस्टच्या कारभारातील कथित गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली फॉरेन्सिक ऑडिटद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन सावंत यांनी केली. बेळगावातील काँग्रेस कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)वर जोरदार टीका केली.
सावंत म्हणाले, देशातील संवैधानिक संस्था, संविधानाची मूल्ये आणि कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा वापर भाजप आणि आरएसएस राजकीय तसेच आर्थिक फायद्यासाठी करत आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असून, मंदिरासाठी आलेल्या देणग्या आणि आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राम जन्मभूमी ट्रस्टमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत, विद्यमान ट्रस्ट बरखास्त करून राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असलेला स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी देशासमोर भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या काही व्यापार करारांवर टीका करताना सावंत यांनी या करारांमुळे शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याचा आरोप केला.

बेळगावात झालेल्या आरएसएसच्या बैठकीचा उल्लेख करत त्यांनी, राम मंदिर ट्रस्टवरील आरोपांबाबत आरएसएसची भूमिका समाधानकारक नसल्याची टीका केली. धर्माच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेला आसिफ सेठ यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





