बेळगाव लाईव्ह :शरीरविक्रय करून जगणाऱ्या महिला… ज्यांच्याकडे पाहताना समाजाचा दृष्टिकोन नेहमीच संकुचित, तिरस्करणीय आणि पूर्वग्रहदूषित राहिलेला असतो. जिवंतपणी ज्यांना मुख्य प्रवाहाने नेहमीच परिघाबाहेर ठेवले, अशाच एका उपेक्षित विश्वात जगणाऱ्या, गणपत गल्लीतील ‘वारंगना’ राखी यांचे आज पहाटे निधन झाले.
नेहमीप्रमाणेच नियतीने तिला शेवटच्या क्षणीही कमालीचे एकटे पाडले होते. तिच्या मृत्यूसमयी ना जवळचे कोणी हक्काचे नातेवाईक होते, ना अश्रू ढाळणारे हक्काचे कुटुंब. निधनानंतर तिचा मृतदेह पुढील कायदेशीर आणि आवश्यक कार्यवाहीसाठी ‘बिम्स’ (सिव्हिल हॉस्पिटल) मध्ये नेण्यात आला खरा, पण तिथे तिच्या पार्थिवावर हक्क सांगायला किंवा तिच्या अंतिम दर्शनासाठी कोणीही पुढे आले नाही.
पण म्हणतात ना, माणूस गेला तरी या जगात माणुसकी कधीच संपूर्णपणे मरत नाही. राखीच्या जिवंतपणी तिच्या जगण्याकडे पाठ फिरवणाऱ्या याच समाजाने, तिच्या आयुष्याच्या अखेरच्या वळणावर मात्र एक कमालीचे अनोखे आणि हृदयस्पर्शी रूप दाखवले. तिच्या पार्थिवाजवळ कोणीही नातेवाईक किंवा आप्तेष्ट नसल्याचे समजताच, समाजातील काही सहृदयी आणि संवेदनशील व्यक्तींनी आपल्या सामाजिक जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव ठेवून तात्काळ पुढाकार घेतला.
राखीच्या या शेवटच्या प्रवासात हक्काचे माणूस बनून साधना महिला संघाच्या सौ. अन्नपूर्णा, बीआरडीएस संस्थेचे दुंडप्पा अंदानी आणि अनगोळकर फाउंडेशनचे सुरेंद्र अनगोळकर धावून आले. आयुष्यभर समाजाने तिला काय दिले किंवा तिच्या वाट्याला काय आले, यापेक्षा ती एक माणूस होती आणि मृत्यूनंतर प्रत्येकालाच सन्मानाने निरोप मिळायला हवा, याच पवित्र भावनेतून हे सर्वजण एकत्र आले होते.

या सर्व सहृदयी व्यक्तींनी केवळ पुढाकारच घेतला नाही, तर सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया अत्यंत धीराने पूर्ण केली. त्यानंतर राखीच्या पार्थिवाला पूर्ण आदराने घेऊन, हिंदू धर्माच्या सर्व रितीरिवाजांनुसार आणि धार्मिक परंपरांनुसार तिच्यावर अत्यंत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार पार पाडले.
राखीचे आयुष्य कदाचित आयुष्यभर अंधारात, संघर्षात आणि अवहेलनेत गेले असेल. समाजाने तिच्याकडे नेहमी एका वेगळ्या, तुच्छ नजरेने पाहिले असेल, पण तिच्या मृत्यूनंतर बेळगावतील या संवेदनशील नागरिकांनी जे पाऊल उचलले, ते समाजाच्या बदलत्या आणि प्रगल्भ मानसिकतेचे जिवंत प्रतीक आहे. जिवंतपणी उपेक्षेचे कमालीचे चटके सहन करणाऱ्या राखीला तिच्या आयुष्याच्या अंतिम प्रवासात मात्र समाजाकडून आदर, सन्मान आणि माणुसकीची उबदार साथ लाभली.
या सहृदयी व्यक्तींनी केवळ एका अनाथ मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत, तर या स्वार्थी जगात ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ हा विश्वास पुन्हा एकदा दृढ केला आहे. उपेक्षित राखीच्या आत्म्याला या मरणोत्तर सन्मानाने नक्कीच चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!





