बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेला पुण्यातील सीमावासी आणि पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगाव मराठी पत्रकार संघ आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने सह्यांची मोहीम आयोजित केली.
यावेळी झालेल्या सभेत सीमाप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील खटला आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कथित भाषिक अन्यायावर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक विश्वनाथ पाखरे यांनी केले.
रामचंद्र पाटील यांनी मराठी भाषिकांवरील कथित अन्याय, कन्नड सक्ती आणि दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबाबत माहिती देत सीमालढ्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले. पीटर डिसोझा यांनी मतभेद विसरून सीमाबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सीमालढ्याला नवे वळण मिळत असून आता अधिक निकराने लढण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच समाजमाध्यमांवर सीमाप्रश्नाबाबत लिहिताना संयम राखण्याचे आवाहन युवकांना केले.

उद्योजक मारुती वाणी यांनी हा लढा कोणत्याही राज्य किंवा भाषेविरोधात नसून सीमावासीयांच्या अस्मितेसाठी असल्याचे सांगत प्रत्येकाने सह्यांच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी दत्ता भेकणे, संदीप घाडी, केदार शिवणगेकर, शिवाजी जळगेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सभेनंतर सह्यांची मोहीम उत्साहात पार पडली.





