बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर मार्गावर कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसेस अधिकृत थांब्यांवर थांबत नसल्याने निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. संतप्त शेतकरी आणि महिलांनी प्रशासनाला थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची तातडीने दखल घेत आज परिवहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह येळ्ळूर रस्त्यावरील थांब्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि उद्यापासून सर्व गाड्या थांबवण्याचे लेखी आश्वासन दिले.
वडगाव, शहापूर, अनगोळ, देसूर आणि राजहंसगड या परिसरातील शेकडो महिला दररोज शेतीच्या कामासाठी येळ्ळूर शिवारात येतात. खरीप हंगाम जोरात सुरू असल्याने सध्या शेतात कामे जास्त आहेत. मात्र, सायंकाळी काम संपवून घरी परतताना बस चालकांकडून या महिलांना डावलले जात होते. गाडीत पुरेशी जागा असतानाही चालक अधिकृत थांब्यांवर बस न थांबवता पुढे निघून जात होते, ज्यामुळे महिलांना रात्री ७ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते.` गेल्या वर्षी याच हंगामात बायपासजवळ थांबत नसलेल्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा मोठा अपघात झाला होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप होता.
शेतकरी महिलांची ही रोजची होणारी फरफट थांबवण्यासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी गावातील नागरिक आणि महिलांना सोबत घेऊन थेट परिवहन वरिष्ठ अधिकाऱ्यांना येळ्ळूर-वडगाव परिसरातील थांब्यांवर आणले.
जिथे अधिकृत बस स्टॉपचे फलक आहेत, त्या सर्व जागा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आल्या. जर अधिकृत थांब्यांवर कर्नाटक बसेस थांबल्या नाहीत, तर शेतकरी रस्त्यावर उतरून चाकाची कोंडी करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी उद्यापासून सर्व चालकांना या थांब्यांवर बस थांबवणे बंधनकारक केले जाईल, असे स्पष्ट केले.

“शेतकरी महिलांचा रोजचा मनस्ताप आता सहन करण्यापलीकडे गेला होता. प्रशासनाला आम्ही स्पष्ट बजावले होते की, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन होईल. आज अधिकाऱ्यांनी स्वतः जागेची पाहणी करून उद्यापासून बस थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. हा शेतकरी महिलांच्या एकजुटीचा विजय असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”अशी प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केली.
परिवहनच्या या सकारात्मक निर्णयामुळे आता शेतकरी महिलांचा वेळेत आणि सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.





