belgaum

वाघवडेतून ज्ञानोबा–तुकाराम पालखीचे भक्तिमय प्रस्थान

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण भागातील वाघवडे येथून जय रामकृष्ण हरी वारकरी सेवा संघाच्या वतीने आयोजित श्री ज्ञानोबा–तुकाराम पालखी सोहळ्याचे रविवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा अखंड जयघोष आणि शेकडो वारकऱ्यांच्या सहभागामुळे परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

सोहळ्याच्या प्रारंभी माऊलींच्या भव्य रथाचे पूजन करून पालखीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार हेब्बाळकर, ह.भ.प. भुजंग महाराज पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला वारकरी डोक्यावर तुळस आणि जलकुंभ घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वारकरी परंपरा ही भक्ती, शिस्त, समानता आणि मानवतेची शिकवण देणारी असल्याचे सांगण्यात आले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांचा आजच्या समाजालाही मोठा आधार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 belgaum

वारकरी शिवाजी बेळगुंदकर यांनी तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून संतांनी दाखविलेल्या भक्तीच्या मार्गाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. अशा धार्मिक आणि सांप्रदायिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचार रुजण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या दिंडीसाठी वाघवडे गावातील नागरिक आणि युवकांनी उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींचा आकर्षक आणि भव्य रथ साकारला आहे. बेळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपाचा रथ प्रथमच उभारण्यात आल्याचा अभिमान ग्रामस्थांनी व्यक्त केला.

वाघवडे येथून निघालेली पालखी आज सावगाव येथे मुक्कामी असून, त्यानंतर होनगा मार्गे टप्प्याटप्प्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. दररोज सुमारे २५ किलोमीटरचा पायी प्रवास करत ही दिंडी २५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार असल्याची माहिती मनोज बेळगुंदकर यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.