बेळगाव लाईव्ह: परदेशात रोजगाराच्या शोधात गेलेल्या खानापूरातील एका युवकाचा नेपाळमध्ये निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम निंगापूर गल्ली येथील साहिल रियाजअहमद मोमीन (25) याचा त्याच्यासोबत राहणाऱ्या रूम पार्टनरने चाकूने वार करून खून केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे खानापूर शहरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, साहिल मोमीन काही वर्षे दुबई आणि त्यानंतर थायलंडमध्ये नोकरी करत होता. सुमारे 25 दिवसांपूर्वी तो नेपाळमधील जाफा जिल्ह्यातील दमक येथील एका हॉटेलमध्ये कामासाठी गेला होता. तेथे तो सद्दाम हुसेन नावाच्या व्यक्तीसोबत एका खोलीत राहत होता.
घटनेच्या आदल्या दिवशी साहिलने बेळगावातील आपल्या एका मित्रालाही त्याच हॉटेलमध्ये नोकरीसाठी बोलावले होते. रात्री तिघेही एकाच खोलीत झोपले असताना साहिल आणि सद्दाम यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. मित्राने मध्यस्थी करून वाद मिटवला; मात्र पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या साहिलवर सद्दामने चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
आरडाओरडा ऐकून मित्राने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील साहिलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच साहिलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी अंजुमन-ए-इस्लामचे तालुकाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांच्याशी संपर्क साधला. तालिकोटी यांनी बेळगाव जिल्हा पोलिसांशी समन्वय साधत नेपाळमधील पोलिसांशी संपर्क करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

साहिलचे वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक शनिवारी नेपाळला रवाना झाले असून, मृतदेह विमानाने भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानाच्या उपलब्धतेनुसार मृतदेह हुबळी, गोवा किंवा बेळगाव विमानतळावर आणला जाईल. त्यानंतर सोमवारी तो खानापूर येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खुनानंतर आरोपी सद्दाम हुसेन उत्तर प्रदेशात पळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नेपाळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच बेळगाव जिल्हा पोलिसांनीही उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती आणि छायाचित्र पाठविल्याचे समजते.
या घटनेमुळे परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, शांत व मनमिळावू स्वभावाच्या साहिलच्या अकाली निधनाने खानापूर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.





