बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ‘शिवम असोसिएट्स’ ही संस्था पूर्णपणे बोगस असून नागरिकांनी अशा कोणत्याही अनधिकृत आणि बेकायदेशीर कंपन्यांमध्ये आपली कष्टाची कमाई गुंतवू नये, असे आवाहन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर कडक लक्ष ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. या बोगस कंपनीच्या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, फसवणूक झालेल्या ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बोगस कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) कोणतीही मंजुरी किंवा अधिकृत परवाना नसताना नागरिकांना जादा व्याजाचे मोठे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा संशय आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून अत्यंत गोपनीयतेने या प्रकरणाचा तपास केला असून, त्याअंतर्गत चार प्रमुख ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.
या कारवाई दरम्यान संशयित बँक खाती आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, या संपूर्ण घोटाळ्याचा १५० पानांचा एक सविस्तर अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या महाघोटाळ्याचा फटका सुमारे ३५ हजारांहून अधिक नागरिकांना बसल्याची भीती व्यक्त होत असल्याने, जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा संस्थांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.





