बेळगावलाईव्ह : गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बेळगावमधील ‘शिवम असोसिएट्स’ या बोगस कंपनीचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले आहे. या महाघोटाळ्याचा सखोल तपास ‘सीआयडी’कडे (CID) सोपवण्याची अधिकृत शिफारस आजच करण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक पडताळणीत या कंपनीचा खरा चेहरा समोर आला. बेंगळुरूमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिवम असोसिएट्स’ या संस्थेची आरबीआयकडे कोणतीही कायदेशीर नोंदणी झालेली नाही. दरम्यान, एका निनावी पत्राद्वारे या बेकायदेशीर व्यवहारांची माहिती ‘सेबी’ (SEBI) आणि ‘सीआयडी’पर्यंत पोहोचली होती, ज्यामुळे आता हा तपास सीआयडीकडे वर्ग केला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिवानंद नीलणावर याने सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढले होते. “१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ३ टक्के परतावा” देण्याचे आमिष त्याने दाखवले होते.
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी शिवानंद नीलणावर हा केवळ बारावी उत्तीर्ण असून पूर्वी चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करायचा. मात्र, लोकांच्या पैशांवर डल्ला मारत त्याने बेकायदेशीरपणे शेकडो कोटींच्या ठेवी जमा केल्या. आरोपीच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून (CA) जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून हजारो नागरिकांची सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
“संशयित आरोपी शिवानंद नीलणावर सध्या पोलीस तपासात कोणतीही मदत करत नाही. त्यामुळे त्याला लवकरच पोलीस कोठडीत घेऊन त्याची सखोल चौकशी केली जाईल. याशिवाय, ज्या लोकांनी या घोटाळ्याच्या पैशांमधून महागड्या आणि आलिशान भेटवस्तू (Aura) घेतल्या आहेत, त्या सर्वांचीही चौकशी केली जाणार आहे.”अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
या कारवाईमुळे बेळगावसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.





