बेळगाव लाईव्ह : सर्वसामान्यांना वार्षिक ३६ टक्के व्याजाचे अवाजवी आमिष दाखवून ठेवी गोळा करणाऱ्या शिवबसव नगर येथील शिवम असोसिएट्सवर प्रशासनाने गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार उपविभागाधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली असून, या संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
शिवम असोसिएट्सकडून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. ही संस्था गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा देण्याचे आश्वासन देत होती, जे नियमांनुसार संशयास्पद मानले जाते.
या व्यवहारांची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर उपविभागाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार्यालयावर धाड टाकत सर्व व्यवहारांची कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, ही संस्था लोकांकडून पैसे गोळा करून ते ‘कौटुंबिक कर्ज’ किंवा हातउसने म्हणून वाटप करत होती. अधिकृत परवानगीशिवाय अशा प्रकारे आर्थिक व्यवहार करणे बेकायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसली तरी, मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही क्षणी या संस्थेवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून, सध्या सर्व रेकॉर्ड्स जप्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. अवाजवी व्याजाच्या हव्यासापोटी नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई अशा संशयास्पद संस्थांमध्ये गुंतवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या छाप्यामुळे शहरातील अनधिकृत सावकारी आणि गुंतवणूक क्षेत्रातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.




