बेळगाव लाईव्ह : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षणाचा तिसरा टप्पा जाहीर केला असून यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली असून, ज्या नागरिकांचे वय या तारखेपर्यंत १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेमुळे दोन्ही राज्यांतील मतदार याद्या अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.
अधिकृत वेळापत्रकानुसार, ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या सर्वेक्षणांनंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
या प्रारूप यादीवर नागरिकांना ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या काळात आपले दावे किंवा हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे. यामध्ये नवीन नाव नोंदवणे, मृत व्यक्तींची नावे वगळणे किंवा पत्ता आणि नावातील चुका दुरुस्त करणे यांसारखी कामे केली जातील.

या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
लोकशाही प्रक्रियेत आपले नाव अधिकृतपणे नोंदवले जावे आणि मतदार यादीत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दाव्यांच्या निपटारा करण्यासाठी २० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.





