belgaum

बेळगावमधील महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

0
659
Fly over
 belgaum


बेळगाव लाईव्ह :  बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजित उड्डाणपूल प्रकल्पाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.


जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. निविदेची औपचारिकता पूर्ण होताच बांधकामाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे, दुसऱ्या टप्प्यासाठीही अतिरिक्त २४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, यामुळे प्रकल्पाला मोठे बळ मिळाले आहे.


प्रकल्पाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सम्राट अशोक सर्कल ते कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल दरम्यानच्या झाडांचे चिन्हांकन आणि मोजणी पूर्ण झाली आहे. रस्ता रुंदीकरण आणि विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतरापूर्वी हे पाऊल महत्त्वाचे मानले जाते. संगम हॉटेल ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावर खांबांच्या आखणीचे खुणा दिसू लागल्याने तांत्रिक कामाला वेग आल्याचे स्पष्ट होत आहे.


प्रस्तावित आराखड्यानुसार, उड्डाणपूल एनएच-४८ वरील गांधीनगरमधील संगम हॉटेलपासून सुरू होऊन शहरातील महत्त्वाच्या चौकांना जोडेल. यामध्ये संगम हॉटेल ते अशोक सर्कल, अशोक सर्कल ते महांतेश नगर, अशोक सर्कल ते पोलीस आयुक्त कार्यालय आणि चन्नम्मा सर्कल ते संभाजी महाराज सर्कल अशा विविध मार्गांचा समावेश आहे. वाहतुकीची गरज ओळखून हा पूल दोन, तीन आणि चार पदरी स्वरूपात बांधला जाणार आहे.


या भव्य प्रकल्पांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ६,६७८ मीटर लांबीचा पूल १६७ खांबांवर उभारला जाईल. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून १,११२ मीटरचा भाग २२ खांबांवर बांधला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच या आराखड्याला मंजुरी दिली आहे.


निविदा प्रक्रिया संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला ३ ते ४ वर्षे लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बेळगावमधील प्रमुख चौकांमधील वाहतुकीचा ताण कमी होऊन शहराच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल.

dc roshan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.