बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कुवेम्पू नगर भागात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी कोल्हापूर येथील तीन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुवेम्पू नगरमधील रहिवासी आणि निवृत्त प्राध्यापक अरुण वामनराव जाधव यांच्या घरी ३ मे २०२६ रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.
एपीएमसी पोलीस निरीक्षक यु. एस. अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ८ मे २०२६ रोजी या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये देवेंद्र उर्फ डॅब्या रमेश वाघमोरे (रा. शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर), सचिन दत्तात्रय गवळी (रा. सुभाष नगर, कोल्हापूर) आणि कपिल उर्फ अप्पा बजरंग जाधव (रा. रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ६७ हजार १८६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख ८३ हजार ८८८ रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल असा एकूण ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या यशस्वी कारवाईत पीएसआय एस. के. होळेन्नवर, एएसआय एम. ए. पाटील, डी. सी. सागर, बसवराज नरगुंद, खादरसाब खानम्मणावर, गोविंदप्पा पुजारी, रफीक मुजावर, शिवाजी चव्हाण, रमेश पाटील तसेच ठसे तज्ज्ञ पथकाचे पीआय आनंद मेत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि उप आयुक्तांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.




