बेळगाव लाईव्ह : जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ७ मे २०२६ रोजी बेळगाव शहरातील एपीएमसी मार्केट परिसरात ‘कोटपा-२००३’ (COTPA) कायद्यांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी नियम मोडणाऱ्या एकूण ४२ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
जिल्हा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखू उत्पादनांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. यावेळी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबाबत दुकानदारांचे आणि नागरिकांचे प्रबोधनही करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान कोटपा कायद्याच्या विविध कलमांतर्गत एकूण ४२ प्रकरणांची नोंद करण्यात आली. तंबाखूमुक्त समाजासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या छाप्यात राज्य तंबाखू नियंत्रण कक्षाचे विभागीय समन्वयक महांतेश उल्लागड्डी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समाजसेविका कविता राजण्णावर, मुत्ताणट्टी आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक राघवेंद्र कांबळे, काशप्पा पामर आणि पोलीस विभागाचे आर. वाय. भोसले यांचा सहभाग होता.




