बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुसळधार पावसात बेनॉन स्मिथ पी.यू. कॉलेजची संरक्षक भिंत कोसळल्याने ड्रेनेज तुंबले आणि पावसाचे पाणी थेट लोकांच्या घरात शिरले.
बेळगावमधील कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज व्यवस्था बिकट अवस्थेत होती. पावसाचा जोर वाढल्यानंतर कॉलेजची भिंत कोसळली आणि तिचा ढिगारा गटारात साचल्याने पाणी जाण्यास जागा उरली नाही. परिणामी, आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये पाणी शिरून फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही नैसर्गिक आपत्ती नसून केवळ बोर्डाच्या निष्काळजीपणामुळे ओढवलेली मानवनिर्मित दुर्घटना असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. प्रशासनाने याकडे वेळेत लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नुकसानग्रस्त नागरिकांनी आता प्रशासनाकडे तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ड्रेनेज व्यवस्था तातडीने दुरुस्त करण्यात यावी आणि या गंभीर प्रकरणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा शब्दांत रहिवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.




