बेळगाव लाईव्ह : कर्तव्याप्रती निष्ठा आणि फिटनेसबद्दलची कमालीची ओढ असणारे आयजीपी संदीप पाटील यांनी सिडनीमध्ये आपली ६ वी ‘आयर्न मॅन ७०.३’ ही आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यासह पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.
सततचे परिश्रम आणि अदम्य इच्छाशक्तीचे दुसरे नाव म्हणजे आयजीपी संदीप पाटील. गोवा, थायलंड, पोलंड, तुर्की आणि कोपनहेगन यांनतर आता ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेली अत्यंत कठीण अशी ‘आयर्न मॅन ७०.३’ शर्यत पूर्ण करत त्यांनी आपल्या शिरपेचात ६ वा मानाचा तुरा रोवला आहे.
धावणे, पोहणे आणि सायकलिंग यांचा समावेश असलेली ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा संदीप पाटील यांनी अत्यंत सहजतेने पूर्ण केली. ही कामगिरी केवळ शारीरिक शक्तीचे प्रदर्शन नसून, त्यांची शिस्त आणि संयमाचा विजय आहे. त्यांचे हे यश तरुण पिढीसह संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरले आहे.




