belgaum

मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी सातत्याने उभे ठाकू – आमदार रोहित पाटील

0
246
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न काही संघटनांकडून सातत्याने होत असले, तरी मराठी माणसाच्या हक्क आणि अस्मितेच्या संरक्षणासाठी आम्ही कायम ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही सांगलीचे आमदार रोहित पाटील यांनी दिली.

शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त बेळगाव दौऱ्यावर आले असता अमित देसाई यांच्या निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सीमाभागातील मराठी समाजाच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली.

आमदार रोहित पाटील म्हणाले की, स्वर्गीय आर. आर. पाटील (आबा) आणि बेळगावचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. महाराष्ट्र एकीकरण समितीशी असलेला भावनिक संबंध आणि सीमाभागातील मराठी माणसाविषयी असलेली आत्मीयता आम्हाला नेहमीच बेळगावकडे खेचून आणते. या भागातील मराठी अस्मिता जपली गेली पाहिजे, ही आमची ठाम भावना आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या संपर्कात राहत असतो.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मागील अधिवेशनात सीमाभागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नापास केल्याच्या मुद्द्यावर आम्ही विधिमंडळात आवाज उठवला होता. सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नावर कठोर आणि ठोस भूमिका घ्यावी, अशी आमची सातत्यपूर्ण मागणी आहे.

 belgaum

काही ठिकाणी जातीयवाद, धर्मांधता, भाषा आणि प्रांतवादाच्या आधारे अल्पसंख्याक समाजांना त्रास दिला जातो. बेळगाव सीमाभागातही काही संघटना मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठी माणसाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी आम्ही कायम उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष मोठ्या प्रमाणावर पैसा वापरून लोकांना किंवा उमेदवारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक मराठी नेते राष्ट्रीय पक्षांचे गुलाम बनल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून ते आवाज उठवू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. मराठी लोकांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली, तर हे लोक कितपत मराठी समाजाच्या पाठीशी उभे राहतील हे सांगता येत नाही. मात्र आम्ही स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठ भावनेतून सीमाभागातील मराठी जनतेसोबत कायम उभे राहू, असे आमदार रोहित पाटील यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.