belgaum

“कॉक्रोच पार्टी” तरुणांच्या असंतोषाची लाट; दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सरन्यायाधीशांच्या कथित झुरळाशी संबंधित टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या संकल्पनेला केवळ विनोद, स्टंट किंवा षडयंत्र म्हणून पाहणे चुकीचे ठरेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व राजकीय अभ्यासक-विश्लेषक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांचा दबलेला आवाज आता संघटितपणे पुढे येत असून, ही नव्या प्रकारच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाची चाहूल असल्याचे त्यांनी सांगितले. “कॉक्रोच जनता पार्टी” या विषयावर बेळगाव लाईव्हशी बोलताना त्यांनी सध्याच्या युवकांच्या मानसिकतेपासून बेरोजगारी, सोशल मीडिया आणि बदलत्या राजकीय वास्तवापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

संभाजीनगर येथील अभिजीत दीपके या तरुणाने सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी” या नावाने चळवळ सुरू केल्याची चर्चा सध्या देशभर रंगत आहे. याला कोणी व्यंगात्मक आंदोलन मानत आहे, तर काहीजण त्यामागे राजकीय अथवा परदेशी हस्तक्षेपाचे तर्क लावत आहेत. मात्र गुणवंत पाटील यांच्या मते, या संपूर्ण घडामोडींकडे युवकांच्या असंतोषाच्या प्रतीकात्मक अभिव्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे.

 belgaum

“वर्षानुवर्षे दबल्या गेलेल्या युवकांचा आवाज सध्याच्या राजकीय व्यवस्थेत योग्य ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्यासपीठाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजची युवा पिढी अभ्यासू, जागरूक आणि विचारपूर्वक भूमिका घेणारी आहे. त्यामुळे या चळवळीला हलक्यात घेणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.

सरन्यायाधीशांच्या कथित वक्तव्यानंतर युवकांमध्ये निर्माण झालेला उद्रेक हा उत्स्फूर्त असून तो कोणत्याही कटकारस्थानाचा भाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “युवकांची मते, अपेक्षा आणि असंतोष समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्यास भविष्यात अधिक गंभीर सामाजिक उद्रेक निर्माण होऊ शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.

२०१४ पूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा संदर्भ देताना गुणवंत पाटील म्हणाले, “त्या आंदोलनालाही युवकांचा मोठा पाठिंबा होता. युवकांना बदल हवा होता. मात्र कालांतराने त्या परिवर्तनात त्यांना स्वतःचा चेहरा दिसेनासा झाला. त्यामुळे आजची पिढी नव्या अभिव्यक्तीच्या माध्यमांचा शोध घेत आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही त्याच नव्या परिवर्तनाची सुरुवात असू शकते.”

सोशल मीडिया भविष्यातील सर्वात प्रभावी राजकीय रणभूमी ठरू शकतो, असे मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “काळानुसार साधने बदलतात. आज सोशल मीडियामुळे युवक एका क्षणात जगभरात आपले मत पोहोचवू शकतात. युवक या माध्यमाचा वापर करत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. सरकार आणि राजकीय पक्षांनी याकडे विरोध म्हणून नव्हे, तर संवादाची संधी म्हणून पाहिले पाहिजे.”

“कॉक्रोच जनता पार्टी ही सरकार उलथवण्यासाठी नव्हे, तर व्यवस्थेकडे युवकांचे प्रश्न पोहोचवण्यासाठी निर्माण झालेली चळवळ आहे. तिच्यामागे पाकिस्तान किंवा परदेशी शक्ती असल्याचे तर्क निराधार आहेत. बेरोजगारी आणि असंतोष ही जागतिक समस्या असल्याने जगभरातील युवकांना या प्रतीकात्मक आंदोलनाशी जवळीक वाटू शकते,” असेही त्यांनी नमूद केले.

देशातील वाढती बेरोजगारी ही अशा उद्रेकामागील मुख्य कारण असल्याचे सांगताना गुणवंत पाटील म्हणाले, “युवकांना बेरोजगार ठेवणे म्हणजे लाखो श्रम तास वाया घालवणे होय. ही राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. सरकारने युवकांच्या हाताला काम देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ठोस धोरणे राबवण्याची गरज आहे.”

“चळवळी या समाजाच्या श्वासासारख्या असतात. त्या केवळ विरोधासाठी नव्हे, तर सुधारणा घडवण्यासाठी उभ्या राहतात. त्यामुळे समाजात अशा चळवळी निर्माण होणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले पाहिजे,” असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.