बेळगाव लाईव्ह :
बेळगावची कन्या कु. अनुष्का अक्षय आपटे हिची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रायोगिक संगीत नाटक विभागातील ‘सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘संगीत शाकुंतल’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनय आणि गायनासाठी तिला हा सन्मान जाहीर झाला असून सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकावण्याची किमया तिने साधली आहे.
अनुष्का आपटे ही बेळगावचे ज्येष्ठ कायदेतज्ञ व कामगार नेते कै. ॲड. राम आपटे यांची नात तसेच ॲड. अक्षय राम आपटे यांची कन्या आहे. मागील वर्षी ‘संगीत आनंदमठ’ या नाटकासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते तिला ‘सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
याशिवाय, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे ‘संगीत लावणी भुलली अभंगाला’, ‘संगीत आनंदमठ’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या नाटकांसाठी अनुष्काला ‘सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री’ म्हणून गौरविण्यात आले आहे.
लहानपणापासूनच विविध नाट्य शिबिरांमधून अनुष्काने आपल्या अभिनय आणि गायनाची छाप पाडली होती. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातून सुभद्रेची भूमिका साकारत तिने संगीत रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. बेळगाव येथे झालेल्या नाट्य संमेलनात या नाटकाचा पहिला प्रयोग रंगला होता. रंगभूमी ग्रुपतर्फे मेधाताई मराठे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते.
त्यानंतर ‘संगीत शारदा’ आणि ‘संगीत स्वयंवर’ अशा नाटकांमधून अभिनयाची वाटचाल करत अनुष्का पुण्याच्या रंगभूमीवरही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकासाठीच्या ‘सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री’ पुरस्काराने तिच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन येत्या 14 जून रोजी मुंबई येथील यशवंतराव ऑडिटोरियममध्ये करण्यात आले आहे. अनुष्का आपटे हिच्या या यशाबद्दल नाट्य क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



