belgaum

तिलारीचे पाणीआणण्यासाठी पुन्हा पाठपुरावा;पालकमंत्र्यांचा 1 प्रतिसाद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप्प धरणाच्या माध्यमातून बेळगावला आणण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा प्रयत्नांना वेग आला आहे. चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील आणि बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी या प्रकल्पासाठी आतापर्यंत झालेला पाठपुरावा आणि महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेळगाव शहरातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय म्हणून तिलारी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीच्या माध्यमातून राकसकोप्प धरणात वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाचा बेळगाव शहरासह सीमाभागातील शेतीला फायदा होऊ शकतो. यासंदर्भात माजी नगरसेवक संघटना गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती. तसेच खासदार जगदीश शेट्टर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती.

पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

 belgaum

यावेळी शिष्टमंडळाने आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांची माहिती देत महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर कोणती पावले उचलणे आवश्यक आहे, याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा केली.

या विषयाबाबत तुम्ही गंभीर असाल, तर आम्हीही हा प्रश्न गांभीर्याने घेऊ. संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती मागवून पुढील प्रयत्न करू, अशी सकारात्मक भूमिका पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडल्याचे सांगण्यात आले.

तिलारीच्या अतिरिक्त पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

माजी महापौरांसह नगरसेवकांची उपस्थिती

या भेटीवेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर किरण सायनाक, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह माजी नगरसेवक संघटनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोप्प धरणात आणण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याला आधार मिळण्याबरोबरच सीमाभागातील शेतीसाठीही पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर या प्रस्तावाच्या पुढील कार्यवाहीकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.