बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा आणि पारीश्वाड येथील अत्यंत महत्त्वाच्या दोन पुलांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने एकूण २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.
मंजूर निधीपैकी ८ कोटी रुपये मणतुर्गा येथील हलात्री नदीवरील नवीन पुलासाठी, तर १५ कोटी रुपये पारीश्वाड येथील मलप्रभा नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.
हे दोन्ही पूल जीर्ण अवस्थेत असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होत होती. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी संबंधित पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मणतुर्गा आणि पारीश्वाड हे पूल खानापूर तालुक्यातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे दळणवळणाचे दुवे आहेत. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे नागरिकांची सुरक्षितता वाढण्यासोबतच वाहतूक अधिक सुकर होणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, “नागरिकांची सुरक्षितता आणि अखंड दळणवळण ही आमची प्राथमिकता आहे. पावसाळा संपताच दोन्ही पुलांच्या बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात येईल.”
या निधी मंजुरीमुळे खानापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अनेक वर्षांपासूनची पुलांची समस्या आता कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




