बेळगाव लाईव्ह : गेल्या काही महिन्यांत विमानफेऱ्यांमध्ये झालेल्या कपातीमुळे बेळगावच्या हवाई संपर्काला उतरती कळा लागल्याची भावना प्रवाशांत होती. मात्र, ऑक्टोबरपासून इंडिगो आणि स्टार एअरच्या नव्या वेळापत्रकामुळे बेळगावच्या हवाई सेवेला पुन्हा बळ मिळणार असून, दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क अधिक सक्षम होणार आहे.
इंडिगोकडून १ ऑक्टोबरपासून बेळगाव-दिल्ली थेट विमानसेवा आठवड्यातील तीन दिवसांऐवजी दररोज उपलब्ध होणार आहे. वाढत्या प्रवासी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे राजधानीशी बेळगावचा थेट संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
तसेच, २ ऑक्टोबरपासून बेळगाव-बंगळुरू मार्गावर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी अतिरिक्त नॉनस्टॉप विमानफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. इंधन दरवाढ आणि अन्य परिचालन कारणांमुळे यापूर्वी कमी करण्यात आलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू होत असल्याने व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, २५ ऑक्टोबरपासून स्टार एअरकडून बेळगाव-अहमदाबाद थेट विमानसेवाही पुन्हा सुरू होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस उपलब्ध असलेल्या या सेवेमुळे उत्तर कर्नाटक आणि गुजरातदरम्यान व्यवसाय, उद्योग तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत.
यामुळे काही महिन्यांपासून कमी झालेल्या विमानफेऱ्यांनंतर बेळगावच्या हवाई संपर्काला पुन्हा चालना मिळणार असून, आगामी सणासुदीच्या हंगामात प्रवाशांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.





