बेळगाव लाईव्ह :पावसाळ्याची सुरुवात होताच खवय्यांसाठी विविध वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. सध्या येथील बाजारपेठेत घटप्रभा आणि हिडकल जलाशय परिसरातून मोठ्या प्रमाणात खेकडे विक्रीसाठी येत असून, खवय्यांची पावले या बाजाराकडे वळू लागली आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांत बेळगावच्या पश्चिम भागातील चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीतील खेकड्यांना मोठी मागणी असते. मात्र, सध्या बेळगाव शहरात हिडकल जलाशय आणि आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या खेकड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बेळगाव कॅम्प येथील फिश मार्केट समोरील रस्त्यावर हे खेकडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. घटप्रभा आणि परिसरातून मोठ्या संख्येने महिला विक्रेत्या येथे दाखल होत आहेत. सध्या शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने हे पावसाळी खाद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे.
या महिलांचे कुटुंबीय रात्रभर नदी आणि जलाशय परिसरातून खेकडे पकडतात. त्यानंतर सकाळी घटप्रभा येथून रेल्वेने प्रवास करत या महिला बेळगाव शहरात खेकडे विक्रीसाठी पोहोचतात. दररोज जवळपास २०० महिला विक्रेत्या या परिसरात खेकडे विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती एका महिला विक्रेत्याने दिली आहे.

बेळगावमधील खवय्यांसाठी ही एक उत्तम पर्वणी ठरत असून ताजे खेकडे मिळत असल्याने बेळगाव शहरासह शहापूर, अनगोळ आणि टिळकवाडी परिसरातील खवय्ये येथे मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत.
पावसाचा जोर जसा वाढेल तशी या खेकड्यांची मागणी आणि किंमत दोन्हीमध्ये वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ बेळगावच नव्हे तर सीमाभागातील इतर गावांमधूनही लोक वीकेंडला हे खेकडे खरेदी करण्यासाठी खास कॅम्प भागात गर्दी करत असून खवय्यांसाठी ही एक उत्तम पर्वणी ठरत आहे.




