बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला ‘ड्रग फ्री बेळगाव’ बनविण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कठोर मोहीम उघडली आहे. सातत्यपूर्ण कारवायांमुळे अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर मोठा आळा बसत असून, गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीत पोलिसांची प्रभावी कामगिरी स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे, 2026 मध्ये 30 जूनपर्यंतच 42.18 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, जप्तीच्या मूल्याच्या दृष्टीने हा गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आकडा आहे.
पोलीस आयुक्तालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 2022 ते 30 जून 2026 या कालावधीत शहरात 152 एनडीपीएस (NDPS) गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत 286 आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण 188 किलो 506 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
आकडेवारीनुसार, 2025 मध्ये सर्वाधिक 49 एनडीपीएस गुन्हे नोंदविण्यात आले. त्या वर्षी 106 आरोपींना अटक करण्यात आली आणि 106 किलो 241 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या जप्त मालाची किंमत 35 लाख 97 हजार 510 रुपये इतकी होती.
तर 2026 मध्ये 30 जूनपर्यंतच 34 गुन्हे उघडकीस आले असून 78 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत 25 किलो 461 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 42 लाख 18 हजार 600 रुपये इतकी आहे. वजनाच्या तुलनेत जप्तीचे मूल्य अधिक असल्याने ही आकडेवारी विशेष लक्षवेधी ठरली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, यंदा हेरॉईनची प्रकरणे अधिक प्रमाणात उघडकीस आल्यामुळे जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जप्तीचे वजन कमी असले तरी त्याची आर्थिक किंमत मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहे.
गेल्या पाच वर्षांतील NDPS कारवाई
- 2022: 21 गुन्हे, 29 आरोपी, 32 किलो 337 ग्रॅम जप्ती, किंमत ₹10.45 लाख
- 2023: 23 गुन्हे, 34 आरोपी, 12 किलो 679 ग्रॅम जप्ती, किंमत ₹5.71 लाख
- 2024: 25 गुन्हे, 39 आरोपी, 11 किलो 788 ग्रॅम जप्ती, किंमत ₹10.69 लाख
- 2025: 49 गुन्हे, 106 आरोपी, 106 किलो 241 ग्रॅम जप्ती, किंमत ₹35.98 लाख
- 2026 (30 जूनपर्यंत): 34 गुन्हे, 78 आरोपी, 25 किलो 461 ग्रॅम जप्ती, किंमत ₹42.19 लाख
‘ड्रग फ्री बेळगाव’ अभियानांतर्गत शहर पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे या रॅकेटला मोठा फटका बसत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विशेषतः उच्च मूल्याच्या हेरॉईनसारख्या अमली पदार्थांवर केलेली कारवाई ही शहर पोलिसांसाठी मोठे यश मानली जात आहे.




