belgaum

काळेनट्टी ग्रामस्थांची जिल्हा प्रशासनाकडे ‘ही’ मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील काळेनट्टी गावामध्ये स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून हक्काची जागा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

काळेनट्टी गावातील या प्रदीर्घ समस्येबाबत ग्रामस्थांनी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश शिगीहळ्ळी यांची भेट घेऊन प्रशासनाकडे दाद मागण्याची विनंती केली. गावाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाची हेळसांड होत असून कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वारंवार विनंत्या करूनही आवश्यक सुविधा मिळत नसल्याने वंचित घटकांना आजही त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच काळेनट्टी गावातील एका तरुणाचे निधन झाले असता, अंत्यसंस्कारासाठी जागा शोधताना ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली होती. यानंतर स्थानिक जमीनमालक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरती जागा उपलब्ध करण्यात आली आणि अंत्यसंस्कार शांततेत पार पडले.

 belgaum

“गावाला जोपर्यंत कायमस्वरूपी स्मशानभूमी मंजूर होत नाही, तोपर्यंत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील. जर अधिकार्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले, तर न्याय आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असे महेश शिगीहळ्ळी यांनी म्हटले.

हा विषय नुकताच बेळगावमधील आदिवासी आणि वंचित घटकांच्या समस्या निवारण बैठकीत डॉ. एल. मूर्ती यांच्यासमोर मांडण्यात आला. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधांच्या अभावावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीअभावी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने तातडीने जागांचे वाटप करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
[

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.