बेळगाव लाईव्ह : सकाळच्या कोवळ्या उन्हात, पायांखालील गवतावरचे दवबिंदू तुडवत आरोग्यासाठी चालणारी पावले जर निसर्गाच्या आरोग्याची काळजी वाहू लागली, तर काय सुंदर घडू शकतं, याचं जिवंत उदाहरण बेळगावात पाहायला मिळत आहे. रोज सकाळी फक्त स्वतःच्या आरोग्यासाठी धावणाऱ्या ‘मॉर्निंग वॉकर्स ग्रुप रेसकोर्स’ने आता बेळगावच्या वसुंधरेला हिरवा शालू नेसवण्याचा विडा उचलला आहे.
शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलाला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बेळगावमधील ‘मॉर्निंग वॉकर्स ग्रुप रेसकोर्स’ने एका अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेची घोषणा केली आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात बेळगाव परिसर आणि आजूबाजूच्या वनक्षेत्रात तब्बल १० हजार फळांच्या बियांची पेरणी करून हिरवाई नटवण्याचा निर्धार या ग्रुपने केला आहे.
या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत मे ते सप्टेंबर २०२६ या संपूर्ण पावसाळ्यात विविध प्रकारच्या फळझाडांची बीज पेरणी केली जाणार आहे. आपण दैनंदिन आहारात वापरत असलेल्या आंबा, जांभूळ, फणस, चिंच, चिकू, सीताफळ, आवळा, बदाम आणि पपई यांसारख्या बहुगुणी फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता, त्यापासून दर्जेदार सीडबॉल तयार केले जातील; जेणेकरून ओसाड जमिनीवर आणि जंगलात नवीन झाडे निर्माण होऊन फळांची उपलब्धता वाढेल.
ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ. शिवाजीराव कागणीकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आखण्यात आला आहे. सध्या विविध विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यावर मात करण्यासाठी हा केवळ एक उपक्रम नसून एक लोकचळवळ व्हावी आणि यातील जास्तीत जास्त झाडे जगवून बेळगाव अधिक सुजलाम सुफलाम करावे, अशी भावना या ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

या महत्त्वपूर्ण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ॲड. मारुती कामाण्णाचे, अनिल नावगेकर, बबन वानखेडे, अशोक तरळे, विजय कंग्राळकर, समीर अनगोळकर, डॉ. पाटील, कलमनी, डिसोजा, विजय सांबरेकर, राहुल राणे, अशोक भुसारी, गाणगेर, शेट्टी आणि प्रभाकर रेवणकर यांसारखे पर्यावरणप्रेमी नागरिक हिरीरीने पुढे आले आहेत.
आपण खाऊन कचऱ्यात फेकून देणाऱ्या फळांच्या बियांमध्ये एका संपूर्ण जंगलाचं भविष्य दडलेलं असतं, हीच जाणीव ठेवत या ग्रुपने यंदाच्या मान्सूनमध्ये तब्बल १० हजार फळझाडांची बीजपेरणी करण्याचा एक अनोखा आणि अत्यंत संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलाला आडोसा देत, निसर्गाचा हरवत चाललेला समतोल पुन्हा साधण्यासाठी या अवलिया पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेली ही मोहीम म्हणजे केवळ एक उपक्रम नसून, बेळगावला अधिक सुजलाम सुफलाम बनवणारी एक मूक क्रांती ठरणार आहे.



