बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे आगामी पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावमधील सुवर्ण विधानसभा सौध येथे भरवण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी सुवर्णसौध परिसराची केलेली पाहणी याच पार्श्वभूमीवर असल्याचे बोलले जात असून, या संभाव्य अधिवेशनावरून आतापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
बेळगावात दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; मात्र या अधिवेशनाचा बेळगावला किंवा येथील जनतेला कोणताही ठोस फायदा होत नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. अधिवेशन काळात येणारे मंत्री, आमदार आणि शासकीय अधिकारी केवळ सुट्ट्या साजरी करण्यासाठी आणि जवळील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करतात, असा थेट आरोप नेहमीच केला जातो. अशातच आता हिवाळी अधिवेशनापाठोपाठ पावसाळी अधिवेशनही बेळगावात घेण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या संभाव्य अधिवेशनादरम्यान विविध संघटनांकडून होणारी आंदोलने आणि मोर्चे लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी हलगा-मच्छे बायपास रस्ता आणि सुवर्णसौध परिसराला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि संभाव्य आंदोलन स्थळांची बारकाईने पाहणी केली.
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. शासकीय पातळीवर ही केवळ प्राथमिक तयारी असली, तरी प्रत्यक्ष पावसाळी अधिवेशन बेळगावात होणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.




