बेळगाव लाईव्ह : बेळगाव जवळील हिंडलगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मी नगर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिरात यंदाही वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात चालत आलेल्या पशू बळी आणि आहेर स्वीकारणे यांसारख्या अनिष्ट प्रथांना पूर्णपणे फाटा देत, केवळ सामाजिक व धार्मिक पद्धतीने हा सोहळा पार पडला. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे हा उत्सव साजरा करून देवस्थान समितीने समाजासमोर एक नवा आणि स्तुत्य आदर्श ठेवला आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या वार्षिक उत्सवाचे यंदा ३३ वे वर्ष होते. उत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली, ज्यामध्ये प्रामुख्याने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची आरास आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुंदर दागिन्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आली होती. देवीची ही मनमोहक आरास लक्ष्मी कानूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती.
सकाळी मंदिरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे ग्रामस्थांनी ठीकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. पालखी देवस्थानात परतल्यानंतर सुवासिनींसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी, मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामूहिक आरती करण्यात आली. या भागात हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते, जिथे धार्मिक उत्सवांसोबतच राष्ट्रीय सणही मोठ्या अभिमानाने साजरे केले जातात.
या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, येथे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो आणि सर्वांसाठी गोड जेवणाचा बेत आखला जातो. यंदाही आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यासोबतच, सामाजिक बांधिलकी जपत ‘एस बी जी’ संस्थेच्या वतीने ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
श्री महालक्ष्मी कल्चरल अँड सोशियल युनियन चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष दत्ताजीराव कानूरकर यांनी सांगितले की, अनेक गावांमध्ये आजही यात्रांमध्ये पशू बळी देणे किंवा आहेर स्वीकारणे या प्रथा पाळल्या जातात. मात्र, लक्ष्मी नगर येथील मंदिरात स्थापनेपासूनच अशा प्रथा बंद करण्यात आल्या आहेत. हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून शुद्ध सामाजिक आणि कौटुंबिक सोहळा आहे आणि हाच आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे.
या संपूर्ण सोहळ्याला कृष्णा बाडीवाले, प्राजक्त केकरे, सुरेश पाटील, राजन टाकळकर, शिवाजी बाडीवाले, शंकर गर्डे, दिनकर गवस, किशोर उरणकर, श्रीकांत लोकरे, सच्चिदानंद चिकोर्डे आदींसह महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




