belgaum

रिअल इस्टेट आणि भूमी अभिलेखांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या हस्ते बेळगावमधील एका विशेष कार्यक्रमात डॉ. नज्जा पीरजादे लिखित ‘फ्रोम लँड टू लेआऊट: प्रॅक्टिकल गायडन्स फॉर रिअल इस्टेट’ या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक कर्नाटक मधील रिअल इस्टेट आणि भूमी अभिलेखांविषयी सर्वसामान्य आणि अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

लेखक डॉ. नज्जा पीरजादे यांनी बेळगाव विभागाचे माजी अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाचे प्रादेशिक संयुक्त संचालक म्हणून २८ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली आहे. या प्रकाशन सोहळ्याला भूमी अभिलेख विभागाचे प्रादेशिक संयुक्त संचालक उमेश, सहाय्यक संचालक, तहसीलदार, महसूल अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर के. एम. जानकी यांनी सांगितले की, हे पुस्तक भूमी अभिलेख, सर्वेक्षण प्रक्रिया आणि शेतजमिनीचे मान्यताप्राप्त लेआऊटमध्ये रूपांतर करण्याच्या कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शासकीय प्रक्रिया आणि नागरिकांमधील समन्वय वाढवण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे, अशी प्रतिक्रिया के. एम. जानकी यांनी दिली.

भूमी अभिलेख विभागाचे प्रादेशिक संयुक्त संचालक उमेश यांनी सांगितले की, हे पुस्तक क्षेत्र अधिकारी, वकील, डेव्हलपर्स आणि सामान्य नागरिकांसाठी कर्नाटकच्या भूमी प्रशासन व्यवस्थेचा एक व्यापक संदर्भ ग्रंथ ठरेल. २८ वर्षांच्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर शासकीय प्रक्रिया सोप्या भाषेत मांडल्याबद्दल उमेश यांनी डॉ. नज्जा पीरजादे यांचे कौतुक केले. लेखक डॉ. नज्जा पीरजादे यांनी पुस्तक लेखनासाठी मिळालेल्या प्रेरणेबद्दल प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांचे विशेष आभार मानले. हे पुस्तक केवळ वैयक्तिक प्रयत्न नसून संपूर्ण विभागाच्या सामूहिक अनुभवाचे आणि समर्पणाचे फलित आहे, असे डॉ. नज्जा पीरजादे यांनी म्हटले.

 belgaum

या पुस्तकाला प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि माजी खासदार पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी आशीर्वाद दिले आहेत. कर्नाटक सरकारच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेंद्र कटारिया यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख आयुक्त वेंकट राजा, कोप्पळचे जिल्हाधिकारी डॉ. सुरेश इट्टाळ आणि बेंगळुरू विभागाचे प्रादेशिक संयुक्त संचालक एस. निसार अहमद यांनी या पुस्तकाबद्दल आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. डॉ. नज्जा पीरजादे यांनी या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बेळगावमधील अमन अर्श पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात टिपण, एफएमबी, आरटीसी, पोडी, जमीन महसूल रूपांतरण, लेआऊटचे नियम, मंजुरी आणि रेरा (RERA) नियमावली यासोबतच भूमी, मोजणी व्ही-३, दिशांक, ई-स्वत्तु, ई-आस्ती आणि कावेरी २.० या डिजिटल पोर्टलच्या वापराविषयी सविस्तर आणि व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.