बेळगाव लाईव्ह : अखिल भारत स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने विविध मागण्यांसाठी २५ आणि २६ मे रोजी देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक्स स्टाफ युनियन कर्नाटक बेळगाव शाखेच्या वतीने शहरातील गोवावेस सर्कल येथे धरणे आंदोलन करण्यात आले. बँकिंग क्षेत्रातील कामगार विरोधी धोरणांचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्टेट बँक प्रशासनासमोर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. बँकांमध्ये रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत आणि मेसेंजर तसेच सशस्त्र रक्षकांची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना पेन्शन फंड मॅनेजर निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि २०१९ पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना आंतर-परिमंडळ स्थानांतरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी यावर आंदोलकांनी भर दिला.
यासोबतच स्टेट बँकेतील वेतनातील तफावत दूर करावी आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना अधिक सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. बँकांमधील कायमस्वरूपी कामांचे आऊटसोर्सिंग करणे आणि अन्यायकारक कामगार पद्धती राबवणे याला युनियनने तीव्र विरोध दर्शवला आहे.
गोवावेस सर्कल येथे जमा झालेल्या शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड ऐश्वर्या बोंगाले, तुकाराम रजपूत, प्रभंजन शिरहट्टीकर, किरण बागलकोट, समीर मेन्से, आरती, संपदा क्षीरसागर, तौफिक शेख आणि राहुल कुर्ले यांनी केले. आंदोलनाच्या शेवटी बेळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले बँक कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य, नागरिक तसेच शांतता राखण्यासाठी सहकार्य करणारे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाचे स्टेट बँक स्टाफ युनियन कर्नाटक बेळगाव शाखेच्या सहाय्यक सरचिटणीस ऐश्वर्या पी. बोंगाळे यांनी आभार मानले.




