बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या मराठी मराठा माणसाची ताकद असलेली ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’… गेल्या कित्येक दशकांपासून मराठी भाषेसाठी, अस्मितेसाठी आणि मातीसाठी लढणारी ही एक सर्वपक्षीय मराठी भाषिकांची अभेद्य चळवळ. हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आहे. ज्या मातीसाठी कित्येक सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांच्या नावावर आजही सीमाभागातील घराघरांत दिवे लागतात; शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून हजारो केस अंगावर घेतल्या आणि हा अखंड लढा जिवंत ठेवला. पण आज याच बलिदानाच्या पवित्र पायावर स्वार्थाचे इमले उभे केले जात आहेत की काय, असा संतापजनक प्रश्न उभा राहिला आहे.
महाराष्ट्रातील थकलेले राजकीय संबंध आणि सीमाभागातील आजची बदललेली समीकरणे पाहिली की लबाड्या लक्षात यायला सुरुवात होतात. कालपर्यंत ज्यांच्याशी रक्ताचा संघर्ष होता, ज्यांच्या अन्यायाविरुद्ध ठिणग्या पडत होत्या, त्याच तलवारी आज अचानक ‘म्यान’ का झाल्या आहेत? आजवर ज्या मराठी भाषिकांनी रक्ताचे पाणी करून ही चळवळ जिवंत ठेवली, त्यांना वाऱ्यावर सोडून आता ‘अभद्र युती’चे नवे डावपेच आखले जात आहेत. आजवर जनतेला केवळ भावनिक साद घालायची, त्यांना गटातटात विभागून आपापसात भांडणे लावायची आणि लोकांची मने कलुषित करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची; हा प्रकार आता सीमाभागात पराकोटीला पोहोचला आहे.
सीमाभागाच्या राजकारणात सध्या जो नवा अंक सुरू झाला आहे, तो अत्यंत भयावह आहे. लोकांना सांगताना ‘आम्ही तुमच्या हिताचा तोडगा शोधतोय’ असे भासवायचे, पण प्रत्यक्षात मात्र बंद दाराआड शत्रूशी हातमिळवणी करायची. ‘अंधारातल्या चर्चा’ कितीही ‘गुप्त’ ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी ‘उदबत्तीच्या प्रकाशात’ का होईना, त्या चर्चांच्या धुराच्या रेषा लोकांना दिसत असतात; हे मात्र या चर्चा करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही.
जे लोक कालपर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू होते, एकमेकांवर धावून जाणारे होते, ते आज गुपचूप ‘एकाच ताटात जेवताना’ दिसत आहेत. हे एका ताटातले जेवण स्नेहभोजन नसून, सीमावासियांच्या पिढ्यानपिढ्यांच्या स्वप्नांचा लिलाव करणारा प्रकार आहे. ही नव्याने झालेली घरोबा पाहून असे वाटते की, सीमावासियांच्या संघर्षाचा पुढचा अंक हा विश्वासघाताचा तर नसेल ना?
आजवर रस्त्यावर लढणारे ‘दळ’आणि ‘कागदावरील वाघ’ परस्पर विरोधी होते, मग आत्ताच का ‘प्रकाश किरणे’ एकत्र झाली, पूर्वी यांच्यातील वितंडवादात सीमा भागातील मराठी माणसाची ,लढ्याची हानी झाली ती कोण भरून काढणार? मराठी माणूस यांच्या नादाला लागून आपल्यातच विभागला गेला एकमेकापासून दुरावला गेला. याला जबाबदार कोण? एकमेकांच्या संस्थांची उनीधुनी काढणे, त्या संस्थात आपली माणसे घुसवून त्या संस्था आपल्या ताब्यात घेणे. दुसऱ्या संस्थेवर काही क्लिमीष आले तर आनंदोत्सव साजरा करणे हे कुणी केलं?? आता मधुचंद्र साजरा करणाऱ्या ह्या लोकांचे इरादे नेक नाहीत.
सीमाभागातील प्रत्येक माणसाने एकच स्वप्न पाहिलंय – अखंडपणे महाराष्ट्रात जाण्याचं! पण कुणाचे तरी वैयक्तिक हितसंबंध कुठेतरी जोडले जाऊन आता वेगळ्याच प्रकारचा काहीतरी ‘तोडगा’ निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमावासियांना “आम्ही तुम्हाला न्याय देतोय” असे सांगत, प्रत्यक्षात त्यांच्या हातामध्ये आश्वासनांचा कोणता तरी रिकामा ‘वाडगा’ टेकवून त्यांची कायमची फसवणूक करण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

या सगळ्यात सर्वात खेदजनक बाब म्हणजे, ज्या हुतात्म्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांचे बलिदान विसरले जाणार आहे. लोकांच्या आंदोलनांचा विसर पडणार आहे. उरणार काय आहे? तर केवळ ‘आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रपंच’. याच आर्थिक प्रपंचातून सीमावासियांचा घात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. “आम्ही काहीतरी तुमचं भलं करतोय” असे गोड बोलत, सीमावासियांचा गळा दाबण्याचे काम लवकरच होणार अशी चिन्हे आहेत.
ज्यांनी आजवर तुम्हाला संघर्षाच्या खाईत लोटले आणि स्वतः सत्तेच्या उबेत बसले, तेच आज पुन्हा एकदा तुमच्या अस्मितेचा सौदा करायला निघाले आहेत. तुमच्या कष्टाचा, बलिदानाचा आणि त्या ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नावाखाली दिलेल्या लढ्याचा व्यापार होऊ देऊ नका. तुमचे नेते जेव्हा अंधारात कुजबुजू लागतात आणि शत्रूच्या ताटात जेवू लागतात, तेव्हा समजून जा की तुमचा लढा आता धोक्यात आहे. जागे व्हा, अन्यथा इतिहास तुम्हाला नव्हे, तर तुमच्या निष्क्रीयतेला जबाबदार धरेल!




