belgaum

तपासणीअंती ‘त्या’ सर्वांची सुटका

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मध्यवर्ती बसस्थानकावर बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शनिवारी मोठी शोधमोहीम राबवली. या कारवाईत संशयास्पद हालचाली करणाऱ्या २० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, सखोल चौकशी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हे सर्वजण भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे.

हुबळीमध्ये अशाच प्रकारची तपासणी झाल्यानंतर बेळगावमध्ये तीन बसमधून संशयित बांगलादेशी घुसखोर आल्याचा दावा श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व व्यक्तींना माळमारुती पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. येथे पोलिसांनी त्यांच्याकडील ओळखपत्रांची आणि इतर कागदपत्रांची कसून पडताळणी केली.

पोलीस चौकशीदरम्यान या नागरिकांनी आपण बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगितले. ते बेळगावमधील शहापूर भागात सुवर्ण व्यवसायात काम करतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते आपल्या गावी गेले होते आणि आता कामासाठी पुन्हा बेळगावमध्ये परतल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

 belgaum

संबंधित कामगारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे वैध असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांचे अंगठ्याचे ठसे घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असून, ते आपापल्या कामावर आणि निवासस्थानी परतले आहेत.

तथापि, सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट आहेत का किंवा त्यांचा अनधिकृत मुक्काम आहे का, याची खात्री करण्यासाठी अंतर्गत पातळीवर पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.