बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने आज शनिवारी सकाळी रहदारी पोलिसांच्या सहकार्याने शहरातील व्यस्त गणपत गल्ली येथे पुन्हा धडक मोहीम राबवून रस्त्यावर केलेली अनधिकृत अतिक्रमण हटवून रस्ता प्रशस्त खुला केला.
बेळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील नेहमी गजबजलेल्या असलेल्या गणपत गल्ली रस्त्यावर यापूर्वी एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काही दिवसात तेथील दुकानदारांसह भाजीपाला फळ व इतर साहित्यांची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा जागा बळकावून अतिक्रमण केले होते.
त्यामुळे गणपत गल्ली रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होऊन पुन्हा पूर्ववत ‘जैसे थे’ परिस्थिती झाली होती. त्यामुळे बेळगाव महापालिकेतर्फे आज या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. रहदारी पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज शनिवारी सकाळी गणपत गल्लीत दाखल होऊन कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे येथील दुकानदार आणि रस्त्यावर फळे व किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली होती.
महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि रहदारी पोलीस आज सकाळी गणपत गल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी नियमानुसार प्रारंभी चेतावणी देऊन कारवाईला सुरुवात केली. पथकाने तेथे दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांनी लावलेले टेबल, स्टॉल, हातगाड्या, फळे-भाजीचे ढीग आणि प्लॅस्टिक व इतर साहित्य दूर केले. तसेच अतिक्रमणाला विरोध करणाऱ्यांचे साहित्य जप्त केले.
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या कांही दुकानदार व विक्रेत्यांशी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवाद साधून त्यांना महापालिकेने उपलब्ध केलेल्या परवानगी प्रक्रियेविषयी माहिती दिली. तसेच चेतावणी नंतरही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक पावले उचलण्याचे संकेत दिले. महापालिकेने आजच्या कारवाईदरम्यान कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता वाढविण्याचे निर्देश देखील दिले. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर गणपत गल्ली रस्ता त्याच्या मूळ स्वरूपात प्रशस्त खुला झाल्यामुळे वाहनचालकांसह बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत होते.




