belgaum

कन्नड सक्ती विरोधात 15 जूनला मोर्चा; म. ए. समितीचा निर्णय

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना येत्या 1 जून रोजी अभिवादन करण्याबरोबरच नामफलकांवरील कन्नड सक्तीच्या विरोधात 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज शनिवारी दुपारी खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर हे होते. बैठकीत प्रामुख्याने येत्या 1 जून रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आणि व्यावसायिक नामफलकांवरील मराठी व इंग्रजी हटवून केली जाणारी कन्नड भाषेची सक्ती या विषयांवर विशेष चर्चा झाली. तसेच कन्नड सक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

बैठकीनंतर बेळगाव लाईव्हला माहिती देताना माजी आमदार मनोहर किनेकर यांनी सांगितले की, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत येत्या 1 जून 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता कन्नड सक्तीच्या विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हिंडलगा येथे सर्वांनी एकत्र जमण्याचा निर्णय घेण्यात आला.

 belgaum

त्या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध असल्याची शपथ घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे नामफलकांवर 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के मराठी किंवा इतर भाषा असाव्यात असा कायदा असून त्याची अंमलबजावणी सरकारी कार्यालयांमध्ये देखील झाली पाहिजे.

तथापि असे घडताना दिसत नाही. त्याचप्रमाणे बेळगाव शहरामध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या लोकांनी गोंधळ घालून मराठी नामफलक काढण्याचे जे सत्र सुरू केले आहे. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ येत्या 15 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी आमदार मनोहर किनेकर यांनी दिली

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.