बेळगाव लाईव्ह : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बेळगावच्या 27 वर्षीय युवकाचा मृतदेह खानापूर तालुक्यातील नंदगड-दंती गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सर्वेश कंग्राळकर (27) असे मृत युवकाचे नाव असून तो शहरातील मारुती गल्ली, सांब्रा रोड परिसरातील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जात असल्याचे सांगून सर्वेश घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी माळमारुती पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मंडोळी रस्त्यावर एका युवकाला मारहाण करून कारमधून नेण्यात आल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी युवकाचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त केली होती.
पोलिसांकडून सर्वेशचा शोध सुरू असतानाच खानापूर तालुक्यातील नंदगड-दंती गावाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सर्वेशच्या मृत्यूचा आणि मंडोळी रस्त्यावर घडल्याचे सांगितल्या जाणाऱ्या घटनेचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र सध्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आरोप निश्चित झालेला नाही.
मृतदेह आढळलेल्या ठिकाणासह सर्वेशच्या बेपत्ता होण्यापासूनच्या घटनाक्रमाची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. मरणोत्तर तपासणीचा अहवाल आणि पोलिस तपासातूनच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद, तर बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सर्वेशच्या मृत्यूमागे नेमके काय घडले, याबाबत सध्या अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.





