belgaum

बेळगावकरांनी तंजावरात फुलविला मराठीचा साहित्यिक सेतू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या स्नेहबंधांना ऐतिहासिक उजाळा देत बेळगावच्या सुमारे ४० साहित्यप्रेमींच्या साहित्ययात्री चमूने तंजावरच्या भूमीत मराठीचा जागर घडविला. ऐतिहासिक तंजावर नगरीत नुकत्याच संपन्न झालेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून साहित्य, काव्य, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा सेतू उभारला.

काव्यसादरीकरण, साहित्यिक संवाद, मान्यवरांचा सन्मान आणि तंजावरच्या ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन यामुळे ही साहित्ययात्रा केवळ संमेलनापुरती मर्यादित न राहता साहित्य आणि पर्यटनाचा बहुआयामी अनुभव देणारी ठरली.

संमेलनाचे उद्घाटन छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष तथा सीमाकवी रवींद्र पाटील यांचा छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 belgaum

यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण आणि विशेष अतिथी आप्पासाहेब गुरव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत छत्रपती बाबाजी राजे भोसले युवराज आबाजी राजे भोसले व संमेलन निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे मानपत्र , शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना रवींद्र पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची भूमिका प्रभावीपणे मांडली. बेळगाव सीमाभागातील मराठी साहित्यिक परंपरा आणि तंजावरच्या मराठी सांस्कृतिक वारशातील अनुबंध अधोरेखित करत, साहित्याच्या माध्यमातून विविध मराठी सांस्कृतिक प्रवाहांमध्ये संवाद अधिक व्यापक करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

यावेळी युवराज आबाजीराजे भोसले, संमेलनाचे निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले, संमेलनाध्यक्ष डॉ. शरद गोरे, स्वागताध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच बेळगावचे सीमाकवी रवींद्र पाटील व उद्योजक आप्पासाहेब गुरव विशेष अतिथी म्हणून आदी मान्यवर उपस्थित होते.

🎤 बेळगावच्या कवींनी रंगविले काव्यसंमेलन

बेळगावच्या कवींनी सादर केलेल्या कवितांनी तंजावरच्या साहित्यरसिकांची मने जिंकली. रामदास बिर्जे, व्यंकाप्पा पाटील आणि विलास बेळगावकर यांनी प्रभावी काव्यसादरीकरण करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

काव्याच्या माध्यमातून बेळगावच्या साहित्यपरंपरेचा परिचय तंजावरच्या रसिकांना झाला. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या भाषणातून आणि साहित्यिक योगदानातून सीमाभागातील मराठीचा स्वर तंजावरच्या साहित्यविश्वापर्यंत पोहोचला.

🌺 ४० साहित्यप्रेमींच्या सहभागाने साहित्ययात्रेला रंगत

या साहित्ययात्रेत सीमाकवी रवींद्र पाटील, आप्पासाहेब गुरव,विलास पवार, अॅड. सुधीर चव्हाण, रामदास बिर्जे, व्यंकाप्पा पाटील, संजय गुरव, अॅड. एन. डी. पाटील, अॅड. महेश कदम, प्रा. रमेश भोसले, नितीन आनंद, नारायण कणबरकर, मोहन पाटील सर, सुभेदार के. आर. मोटर, शिवाजी खांडेकर, सयाजीराव सावंत, शशिकांत अष्टेकर, कृष्णा गवंडी, मोहन मन्नोळकर, रघुनाथ पाटील, तानाजी पाटील, रामलिंग देसाई आणि मनोहर संताजी , नंदन पाटील , सौ. नम्रता नंदन पाटील ,दिलाप चव्हाण यांच्यासह खानापूरातून विलास बेळगावकराच्या नेतृत्वाखाली दहा बारा -जन साहित्यप्रेमी हजेरी होती. तसेच अनेक साहित्यप्रेमी सहभागी झाले.

या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून बेळगावची साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकजूट अधोरेखित झाली.

🏛️ इतिहासाच्या साक्षीने तंजावर दर्शन

साहित्य संमेलनाबरोबरच बेळगावच्या साहित्ययात्रींनी तंजावरच्या ऐतिहासिक वैभवाचा अनुभव घेतला. तंजावरचा राजवाडा, आर्ट गॅलरी, दरबार हॉल, विठोबा मंदिर आणि जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर यांना भेट देत मराठा इतिहासाच्या समृद्ध पाऊलखुणांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

इतिहासाच्या पुस्तकांतून वाचलेले वैभव प्रत्यक्ष वास्तूंच्या रूपाने अनुभवण्याची संधी या साहित्ययात्रेतून मिळाली.

🚩 अक्षरांची पालखी घेऊन तंजावरच्या दारी

बेळगावकरांची ही साहित्ययात्रा म्हणजे केवळ एका साहित्य संमेलनातील सहभाग नव्हता; तर बेळगावच्या मराठी साहित्यविश्वाने तंजावरच्या मराठी सांस्कृतिक परंपरेशी साधलेला स्नेहसंवाद होता.

सीमाभागातील मराठीचा स्वर तंजावरच्या भूमीत घुमवित, साहित्यिक मैत्रीचे नवे धागे जोडत आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवत बेळगावच्या साहित्ययात्रींनी या प्रवासातून अक्षरांची पालखी आणि आठवणींची अमोल शिदोरी सोबत घेतली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.