बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने उद्या रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता कमल (कम्मार) तलाव, सांबरा येथे ‘मल्लविद्येचा महासंग्राम’ हे निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत असलेल्या या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती शिवरामदादा, पुणे येथील हिंदू गर्जना केसरी पै. शुभम सिधनाळे आणि सोनीपत, हरियाणाचा भारत केसरी पै. अजय वरण यांच्यात खेळविली जाणार आहे.
तसेच दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या कुस्त्या अनुक्रमे दसरा कंठीरवा केसरी पै. कामेश विरुद्ध दिल्लीचा पै. करण, उत्तर कर्नाटक केसरी पै. शिवा दड्डी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. सत्पाल, कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम विरुद्ध इस्लामपूरचा पै. शिवकुमार जंगम आणि शिरगुप्पीचा पै. सचिन विरुद्ध सांगलीचा पै. सौरभ मरकड अशा लावण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त सुमारे 50 हून अधिक लहान -मोठ्या चटकदार कुस्त्या या कुस्ती मैदानात होणार आहेत.
सदर कुस्ती मैदानाबद्दल बेळगाव लाईव्हला अधिक माहिती देताना सांबरा कुस्तीगीर कमिटीचे पदाधिकारी यल्लाप्पा हरजी यांनी उद्या होणाऱ्या भव्य जंगी कुस्ती मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्तीतील पुण्याचा शुभम सिधनाळे या पैलवानाने अलीकडेच प्रख्यात पै. सिकंदर शेख याला चितपट करून ‘हिंदू गर्जना केसरी’ हा किताब हस्तगत केला आहे. अशा या पै. सिधनाळे याची लढत उत्तर भारतात धुमाकूळ घालणारा सोनीपत हरियाणाचा पैलवान अजय वरण याच्याशी होणार आहे असे सांगून सांबरा कुस्ती मैदानात होणाऱ्या इतर प्रमुख कुस्त्यांची माहिती दिली.

तसेच बेळगाव पंचक्रोशीतील सर्व कुस्तीप्रेमी, वस्ताद मंडळी व पैलवानांनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा. देणगीदारांनी देखील मैदानाला उपस्थित राहून मानसन्मान स्वीकारावा असे आवाहन करून गेल्या कांही दिवसांपासून सांबरा कुस्तीगीर कमिटीचे पदाधिकारी सदस्य,
आखाडा निर्माण करणारे तज्ञ व ग्रामस्थांच्या सहकार्याने सांबरा गावच्या उत्तरेकडील कमल तलावाच्या ठिकाणी प्रथमच नवा कुस्ती आखाडा तयार करण्यात आला आहे, याची सर्व कुस्ती शौकिनांनी नोंद घ्यावी, असे हरजी शेवटी म्हणाले. याप्रसंगी कुस्तीगीर कमिटीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




