belgaum

वाहतूक शिस्त आणि महिला सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांची ‘मोहीम

0
183
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात वाहतूक सुसूत्रता आणण्यासाठी आणि महिलांचा रिक्षा प्रवास सुरक्षित करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.

माळमारुती पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील वाहतूक बदलांबाबत महत्त्वाची माहिती दिली. बेळगावमधील बाजारपेठ आणि विशेषतः रविवार पेठ भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार या भागात ‘वन-वे’ नियमांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ‘एनआयए’ने देखील यावर पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असून, कारागृहात मोबाईल पोहोचवणाऱ्या साखळीचा महिनाभरात पर्दाफाश करून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला.

 belgaum

महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शहरातील १० हजार अधिकृत रिक्षांमध्ये ‘क्यूआर कोड’ प्रणाली राबवण्यात येणार आहे. रिक्षात बसल्यानंतर प्रवाशांनी हा कोड स्कॅन केल्यास चालक आणि मालकाचा संपूर्ण बायोडाटा समोर येईल. यामुळे प्रवाशांना आपला प्रवास ट्रॅक करता येईल आणि सुरक्षिततेची खात्री पटेल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

शहरात सध्या विनापरवाना धावणाऱ्या सुमारे २ हजार रिक्षांना कायदेशीर प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी विशेष सवलत दिली आहे. एका एजन्सीमार्फत या चालकांना मोफत ओळखपत्रे आणि क्यूआर कोड दिले जातील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जे चालक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.

मुजावर खूटसह रविवार पेठ येथे लवकरच एकेरी वाहतूक -पोलीस आयुक्त बोरसे

बेळगाव शहरातील देशपांडे पेट्रोल पंप ते मुजावर खूटपर्यंतच्या रस्त्यासह रविवार पेठतील व्यापारी दुकानदारांनी संमती दिल्यामुळे येत्या कांही दिवसात सर्वांना संबंधित ठिकाणी एकेरी वाहतुकीसह शिस्त पहावयास मिळेल, अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.

जळगाव शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रविवार पेठ आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाच्या योजनांविषयी माहिती देताना ते बोलत होते. आम्ही शहरातील देशपांडे पेट्रोल पंप ते मुजावर खूटपर्यंतचे व्यापारी दुकानदार आणि रविवार पेठेतील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. बैठकीतील चर्चेअंती दोन्ही ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यावर एकेरी वाहतुकीचा नियम लागू करण्यास संमती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील शिस्त व पार्किंगच्या सूचनाही त्यांनी मान्य केल्या आहेत. रविवार पेठ परिसरात महापालिकेची खुली जागा आहे, ज्या ठिकाणी केरकचरा टाकला जातो ती जागा पार्किंगसाठी स्वच्छ करून देण्याची विनंती मी महापालिका आयुक्तांना करणार आहे. ज्यामुळे रविवार पेठ येणाऱ्या मालवाहू वाहनांच्या पार्किंगची तात्पुरती सोय होईल. एकंदर येत्या कांही दिवसात आपल्याला संबंधित ठिकाणी एकेरी वाहतुकीसह शिस्त पहावयास मिळेल. आम्ही टप्प्याटप्प्याने सुधारणा करत असून बेळगाव शहर आंतरराष्ट्रीय शहराप्रमाणे विकसित व्हावयाचे असेल तर संपूर्ण शहरांमध्ये एक प्रकारची शिस्त यावयास हवी. आमचा वाहतूक पोलीस विभाग उत्तम कार्य करत असून सक्ती करणे किंवा दंड वसूल करणे हा आमचा उद्देश नाही. रस्त्यावर शिस्त असेल तर सर्वसामान्यांपासून रुग्णवाहिका, आगीचे बंब, पोलीस वाहने सर्वांनाच जलद व सुलभ संचार करणे सोयीचे जाते. त्यामुळे आगामी काळात वेगवेगळ्या भागांमध्ये सार्वजनिक बैठका घेऊन रस्त्यावरील मार्गिका पालन शिस्त, पार्किंग आणि आवश्यक ठिकाणी एकेरी वाहतूक यांची अंमलबजावणी केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पुढे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.