बेळगाव लाईव्ह : कर्नाटक पोलीस प्रशासनाने गैरकृत्य आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कर्नाटक राज्य पोलीस (केएसपी) ॲप विकसित केले असून नागरिकांना या ॲपद्वारे पोलिसांना कोणत्याही गुन्ह्याची माहिती अनामिकपणे देता येणार आहे, अशी माहिती घेऊन या ॲपच्या सहाय्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी केले.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक (एस.पी.) कार्यालयामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोलीस अधीक्षक रामराजन म्हणाले की, नागरिकांना अनेकदा पोलिसांना माहिती देण्यास संकोच, भीती वाटतो, तथापी आता त्यांच्याकडे अनामिकपणे घटनेची माहिती देण्याचा पर्याय आहे.
ते मोबाईल प्ले स्टोअरवरून केएसपी ॲप डाउनलोड करू शकतात. नागरिक या ॲपद्वारे पोलिसांना कोणत्याही गुन्ह्याची माहिती अनामिकपणे देऊ शकता. आम्हाला त्यांचा फोन नंबर किंवा इतर तपशील कळणार नाही, तरीही त्यांची माहिती पोलीस मुख्यालयाला दिली जाईल, जी पोलीस उपमहानिरीक्षक (डीजी) स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल.
त्यामुळे माहिती कोणी दिली हे कोणालाही कळणार नाही. तेंव्हा नागरिकांनी कोणत्याही गुन्ह्याची किंवा गुन्हेगारी कृत्यांची माहिती द्यावी, जी गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल.
केएसपी ॲपवर सध्या आम्हाला अनेक गुन्हेगारी कृत्यांची माहिती मिळत आहे. त्यामध्ये विशेषतः गावागावांमध्ये होणारी दारूची अवैध विक्री, त्याव्यतिरिक्त सार्वजनिक उपद्रवाची माहिती आदींचा समावेश आहे. खुनाच्या प्रकरणाबद्दल सहसा कोणीही माहिती देण्यास तयार नसतो, परंतु आम्हाला केएसपी ॲप्लिकेशनद्वारे ती माहिती मिळाली आहे.
म्हणून आम्ही सर्वांना आग्रह करतो की अंमली पदार्थांचा वापर, लैंगिक छळ इत्यादींसारखी कोणतीही बेकायदेशीर कृत्यच नव्हे तर महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या रॅगिंगबद्दल दखील केएसपी ॲपवर माहिती देता येऊ शकते. ज्याची गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी शेवटी स्पष्ट केले.





