belgaum

फोर्ट रोडला जोडणाऱ्या ‘या’ रस्त्यांवरील एकेरी वाहतूकीचा बोजवारा

0
599
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :वाढत्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी बेळगाव शहरातील देशपांडे पेट्रोल पंपपासून फोर्ट रोडवरील मुजावर खूट व जिजामाता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकेरी वाहतूक नियम लागू केला असला तरी सध्या त्याचा बोजवारा उडाला असल्यामुळे त्याकडे रहदारी पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे काल 14 एप्रिलपासून शहरातील देशपांडे पेट्रोल पंपपासून पश्चिमेकडून पूर्वेकडे फोर्ट रोडवरील मुजावर खुटपर्यंत आणि जिजामाता चौकापासून पूर्वेकडून पश्चिमेकडे देशपांडे पेट्रोल पंपपर्यंत एकेरी वाहतुकीचा नियम लागू केला आहे.

तसेच शहरातील वाहन चालकांनी याची नोंद घेऊन नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही केले आहे. तथापि त्यांच्या आवाहनाला सध्या वाहनचालकांकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. एकेरी वाहतुकीचा नियमाच्या अंमलबजावणीसाठी मुजावर खूट व जिजामाता चौक रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स घालण्यात आले असले तरी नियमाच्या अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

 belgaum

परिणामी नियमाचे उल्लंघन करत विशेष करून मुजावर खूटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच कार गाड्या, प्रवासी रिक्षा, दुचाकी यांची दोन्ही बाजूने रहदारी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.

तरी बेळगाव उत्तर विभाग रहदारी पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित रस्त्यांच्या ठिकाणी कायमस्वरूपी रहदारी पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिक दुकानदार, व्यावसायिक व जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.