belgaum

घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरातील बहार गल्ली परिसरातील आश्रय कॉलनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तिजोरी फोडली आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. या चोरीत भोसले कुटुंबीयांचे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बहार गल्ली नजीकच्या आश्रय कॉलनीमध्ये राजू भोसले यांचे दुमजली घर आहे. घराच्या खालच्या मजल्यावर त्यांची आई, तर वरच्या मजल्यावर राजू भोसले व त्यांची पत्नी राहतात. काही कामानिमित्त भोसले यांच्या आई घराला कुलूप लावून गावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी तिजोरी फोडून त्यातील दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने, दहा तोळे चांदीच्या वस्तू आणि अंदाजे दोन ते तीन हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान, घरात अन्य ठिकाणी ठेवलेला सोन्याचा हार चोरट्यांच्या नजरेस न पडल्याने तो चोरी होण्यापासून बचावला.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी बेळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

या घरफोडीच्या घटनेमुळे आश्रय कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.