belgaum

बळ्ळारी आणि लेंडी नाला समस्यांची आमदारांकडून पाहणी

0
183
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध गंभीर समस्यांची दखल घेत आमदार असिफ सेठ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील बुजलेल्या पाईप आणि नाल्यांच्या दुरवस्थेमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन आमदारांनी दिले आहे.


शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बेळगावमधील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदारांकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर टाकण्यात आलेल्या भूमिगत पाईप बुजल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची बाब समोर आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून, महामार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तोडगा म्हणून याठिकाणी फ्लायओव्हर बांधण्यासंदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार असिफ सेठ यांनी दिले.


लेंडी नाला आणि बळ्ळारी नाला परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाळ्यात दूषित पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या वळिवाच्या पावसामुळे लेंडी नाल्यातील पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या पाण्यात शहरातील सांडपाणी आणि ‘मेडिकल वेस्ट’ येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या नाल्याचे दोन्ही बाजूंनी रुंदीकरण करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे नियोजन लवकरात लवकर करण्याचे निर्देश आमदारांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


येथील समस्यांबाबत आमदारांना निवेदन दिले होते, त्या अनुषंगाने त्यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत येऊन पाहणी केली आहे. येथील पाईप मोकळ्या करून पाण्याचा निचरा केल्यास आमचा प्रश्न सुटेल, असे आश्वासन आम्हाला मिळाले असून आता प्रशासकीय कारवाईची प्रतीक्षा आहे, अशी माहिती शेतकरी नारायण भैरु सावंत यांनी दिली.


बळ्ळारी नाल्याचा प्रश्न दरवर्षी उग्र रूप धारण करतो, मात्र अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. यावेळी आमदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सांडपाणी शेतात का शिरत आहे, याचा तांत्रिक तपास करून अहवाल देण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, रमेश मोदगेकर आदी.परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.