बेळगाव लाईव्ह : एसएसएलसी परीक्षेत सेंट जोसेफ शाळेची साक्षी पालनकर हिने शहरात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. साक्षीने ६२५ पैकी ६२० (९९.२०%) गुण मिळवत सेंट मेरीज शाळेच्या संजोता हावळ हिच्यासोबत अव्वल स्थान मिळवले आहे.
याचबरोबर शाळेतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एलिझा शकील मुल्ला हिने ९८.०८% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर उर्वी वांगिकार हिने ९७.४४% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
यावर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा लौकिक उंचावला आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एलिझा मुल्लाचे आमदार राजू सेठ यांच्याकडून कौतुक
बेळगाव शहर शैक्षणिक विभागाने जाहीर केलेल्या एसएसएलसी गुणवत्ता यादीत सेंट जोसेफ हायस्कूलची विद्यार्थिनी एलिझा शकील मुल्ला हिने शहरात आठवा क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
एलिझा हिने ६२५ पैकी ६१३ गुण मिळवून शहरात आठवा, तर शहरातील मुस्लीम विद्यार्थ्यांच्या यादीत आणि सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. ती बेळगावच्या नगरसेविका अफरोज शकील मुल्ला आणि काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष शकील बशीर मुल्ला यांची कन्या असून, तिच्या या यशामुळे मुल्ला परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एलिझाच्या शैक्षणिक कौशल्याची दखल घेत बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी तिला यापूर्वीच शाळेत ‘बेस्ट गर्ल ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.




