belgaum

शिवजयंती मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्त, उपायुक्तांचा सत्कार

0
235
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावची ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूकीसह वडगाव येथील चित्ररथ मिरवणूक शांततेने सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शहरवासीय व नगरसेवकांतर्फे आज पोलीस आयुक्त व उपायुक्तांना धन्यवाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

बेळगाव शहरवासीय व नगरसेवकांतर्फे नगरसेवक रवी साळुंके व माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने आज गुरुवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

यावेळी नगरसेवक साळुंखे व माजी नगरसेवक हलगेकर यांनी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचा मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिस्थिती कौशल्याने हाताळल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानले.

 belgaum

त्यानंतर शिष्टमंडळाने कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांचा देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंके व माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या समवेत राजू सावंत, अनंत बिर्जे, जोतिबा शहापूरकर, प्रसाद मुतगेकर आदी उपस्थित होते.

निवेदन सादर करण्यापूर्वी बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक रवी साळुंके यांनी, गेल्या 107 वर्षाप्रमाणे बेळगावची ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडली. यासाठी समस्त शिवभक्तांसह पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन वगैरे सर्व सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांनी उत्तम सहकारी केले. यंदाची तब्बल 13 तास चाललेली श्री शिवजयंती मिरवणूक कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थित पार पडली असे सांगून सर्व सरकारी अधिकाऱ्यांसह शिवजयंती उत्सव मंडळांना धन्यवाद दिले.

माजी नगरसेवक मनोहर हलगेकर म्हणाले की, बेळगाव शहर आणि वडगाव येथील श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल पोलीस आयुक्तांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. यंदा देखील श्री शिवजयंती मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली.

यावेळी प्रथमच डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणूक झाल्यामुळे बराच फरक पडला. मिरवणुकीत सहभागी मंडळांना शिस्त लावण्याचे काम पोलीस आयुक्तांनी कौशल्याने पार पाडले. यासाठी महिन्याभरापूर्वीपासून बैठका वगैरे घेऊन त्यांनी जे जागृती करण्याचे कार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.