belgaum

पीयूसी निकालात उडुपी जिल्हा निकालात अव्वल!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने २०२६ चा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत ऐतिहासिक सुधारणा पाहायला मिळाली आहे.

यंदा राज्याचा एकूण निकाल ८६.४८ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या ७३.४५ टक्के निकालाच्या तुलनेत यात तब्बल १३.०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यांच्या क्रमवारीत यंदाही किनारी जिल्ह्यांचे वर्चस्व कायम राहिले असून, उडुपी जिल्ह्याने ९६.३९ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर दक्षिण कन्नड जिल्हा ९६.३५ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

बेळगाव जिल्ह्यासाठी हा निकाल अत्यंत अभिमानास्पद ठरला असून, गोगटे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने ६०० पैकी ५९९ गुण मिळवून वाणिज्य शाखेत संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखांमध्ये आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. वाणिज्य शाखेत ध्वनी कुलकर्णी पाठोपाठ गोकाकच्या सी.एस.ए. कॉलेजची विद्यार्थिनी दिव्यप्रभा मणिवन्नन हिने ५९७ गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले.

विज्ञान शाखेत निदसोशी येथील मोरारजी देसाई महाविद्यालयाचा अंकित भीमप्पा करातगी याने ५९८ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर कला शाखेत अथणीच्या जे.ए. पीयू कॉलेजचा शिवानंद मुरगेप्पा बुरलट्टी ५९५ गुणांसह अव्वल ठरला आहे.

याच शाखेत लिंगराज कॉलेजची सृष्टी सोलोनी (५९४ गुण) आणि घटप्रभा येथील अश्विनी सिंगोटी (५९३ गुण) यांनीही टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे. बेळगाव जिल्ह्याचा एकूण निकाल ८०.३२ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या ६५.३७ टक्क्यांच्या तुलनेत जिल्ह्याने निकालात सुमारे १५ टक्क्यांची उल्लेखनीय प्रगती केली आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांचा विचार करता, विजापूर जिल्ह्याने यंदा सर्वांत मोठी झेप घेतली असून, गेल्या वर्षीचा ५८.८१ टक्के निकाल यंदा थेट ९२ टक्क्यांवर नेला आहे. उत्तर कन्नड (९१.७८%), बेंगळुरू ग्रामीण (९१.००%) आणि चिक्कबल्लापुरा (९०.२४%) या जिल्ह्यांनीही ९० टक्क्यांहून अधिक निकाल लावत आघाडी घेतली आहे. राज्याच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण विभागातून समाधान व्यक्त होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील आणि मोरारजी देसाई सारख्या सरकारी संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यादगिरी जिल्हा ७१.२१ टक्क्यांसह क्रमवारीत तळाला असला तरी, त्यांनीही गेल्या वर्षीच्या ४८.४५ टक्क्यांच्या तुलनेत मोठी सुधारणा दर्शवली आहे. या निकालामुळे उच्च शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जिल्हा प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.