belgaum

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची कोठडी

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा विशेष पोक्सो न्यायालयाने ३० वर्षे कठीण कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला दंड ठोठावण्यासोबतच पीडितेच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्याचे आदेशही दिले आहेत. बेळगावमधील शहापूर पोलीस ठाण्यामध्ये ९ एप्रिल २०२५ रोजी या प्रकरणाची फिर्याद दाखल झाली होती.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास केला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा विशेष जलदगती पोक्सो न्यायालय-१ मध्ये पार पडली.

हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथील रहिवासी असलेल्या तनोज बाबू गाडीवड्डर याने १ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पवयीन पीडितेचे दुचाकीवरून अपहरण केले होते. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार करून याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वारंवार झालेल्या अत्याचारानंतर पीडिता गर्भवती राहिली आणि तिने एका बालकाला जन्म दिला, असा मजकूर दोषारोपपत्रात नमूद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसवा आणि पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांनी करून न्यायालयात पुरावे सादर केले होते. सुनावणी दरम्यान एकूण ८ साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली आणि ७२ महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्यात आले.

 belgaum

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम ६ नुसार ३० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड, तर बीएनएस कायद्यांतर्गत ७ वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड सुनावला.

दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ७ लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि ती रक्कम बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवावी, असे आदेश सी. एम. पुष्पलता यांनी दिले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.